नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीत भरभरून जागा देणाऱ्या उत्तर भारतातील भाजपाची लाट ओसरली आहे. त्यामुळे सत्तेत राहायचं असेल, तर हा खड्डा भरून काढणं आवश्यक आहे. त्यामुळे नवनवे मित्र जोडत आतापर्यंत अस्तित्व नसलेल्या राज्यांत पाय रोवण्याचा प्रयत्न भाजपानं सुरू केला आहे. तामिळनाडू हे महत्त्वाचे राज्य आहे. काँग्रेसनेही डीएमकेसोबत आघाडी नक्की केल्याने आता सत्तेचा द्राविडी प्राणायाम रंजक होणार आहे.
द्रविडी संस्कृतीचे केंद्र असलेल्या तामिळनाडूमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. मात्र तमिळ अस्मिता प्रखर असलेल्या या राज्यात दोघांनाही स्थानिक पक्षांची मदत घ्यावी लागली आहे. त्यामुळेच भाजपने एआयएडीएमके आणि पीएमके आघाडीमधला छोटा भाऊ होणे पसंत केले आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ५ तर पीएमके ७ जागा लढवणार आहे. उरलेल्या २७ जागांवर एआयएडीएमके लढणार आहे. अन्य छोटे पक्ष युतीमध्ये आल्यास त्यांना एआयएडीएमकेच्या कोट्यातून जागा सोडल्या जातील, अशी शक्यता आहे. याबाबत भाजप तामिळनाडू प्रभारी पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.
दुसरीकडे गेले अनेक दिवस मैत्रीच्या आणाभाका घेणाऱ्या काँग्रेस आणि डीएमकेनेही अखेर जागावाटपाचा अंतिम स्वरुप दिले आहे. तामिळनाडूमधल्या ३९ जागांपैकी ३० जागा डीएमके लढवणार आहे. तर ९ जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत. पद्दुचेरीची एकमेव जागा काँग्रेस लढवणार आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत देशात नरेंद्र मोदींची आणि तामिळनाडूमध्ये अम्मांची लाट होती. त्यामुळे या निवडणुकीत एआयएडीएमकेने ३९ पैकी तब्बल ३७ जागा खिशात घातल्या. भाजपाने एक तर एआयएडीएमकेचा मित्रपक्ष असलेल्या पीएमकेने एक जागा जिंकली. काँग्रेस आणि डीएमकेला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे या आघाडीकडे आता लक्ष लागले आहे.
मात्र आता मोदी लाट ओसरली आहे. जयललिता आणि एम. करुणानिधी या दिग्गज नेत्यांचे निधन झाले आहे. तामिळनाडूची निवडणूक एआयएडीएमकेचे ई. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम तसंच डीएमकेचे एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. नव्या नेतृत्वाचा कस लावणारी ही निवडणूक असेल अशी चर्चा आहे.