मलप्पूरम : केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुले सासरच्यांचा रोष पत्करत कित्येक दिवस सासरच्या घरापासून दूर असणाऱ्या कनक दुर्गा यांनी अखेर त्यांच्या पतीच्या घरी प्रवेश केला आहे. मंदिरात प्रवेश केल्याच्या कारणामुळे कुटुंबीयांच्या रोषाचा सामना कराव्या लागणाऱ्या कनक दुर्गा यांनी केरळच्या उत्तरेकडे असणाऱ्या मलप्पूरम येथील त्यांच्या सासरच्या घरी अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रवेश केला आहे.
दोन मुलांची आई असणाऱ्या दुर्गा यांनी मंगळवारी अंगदीपूरम येथे असणाऱ्या त्यांच्या रिकाम्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या पतीने दोन्ही मुलांना घेऊन जात भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. याविषयीच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'माझ्याकडे न्यायालयाचे आदेश आहेत ज्यामुळे आता मी माझ्या घरात प्रवेश करु शकते. मला या क्षणाला फारच आनंद होत असून, आता पुढे काहीच बोलायचं नाही आहे. मी आज माझ्या मुलांना पाहू शकत नसले तरीही भविष्यात मात्र मी त्यांनी नक्की पाहीन', असं त्या म्हणाल्या.
आपल्याला सासरच्या मंडळींसोबत राहण्याला काहीच हरकत नसून, त्यांनाच माझ्यासोबत रहायचं नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट करत येत्या काळात परिस्थिती सुधारण्याची आशा व्यक्त केली.
गेल्या बऱ्याच महिल्यांपासून चर्चेत असणाऱ्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश मिळण्याचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्याचदरम्यान, कनकदुर्गा आणि आणखी एका महिलेने शबरीमला येथील अय्यप्पा स्वामी मंदिरात प्रवेश केला. ज्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला घरात प्रवेश देणं नाकारलं होतं. याचविरोधात जात पूलमंथोल ग्राम न्यायालयाकडूनया प्रकरणी अंतरिम आदेश देत पतीच्या घरी राहण्याचा दुर्गा यांचा हक्क असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्चला होणार आहे.
Kanaka Durga says, "I got the court order&I could enter my house. I'm happy. I could not see my children today, but I hope I can see them next time. I don't have any difficulty to stay with them, they are not ready to stay with me. Everything will be solved." (05.02.2019) #Kerala https://t.co/bl3NZHqzJx
— ANI (@ANI) February 6, 2019
शबरीमला मंदिरातून परतल्यानंतर पतीच्या आईने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दुर्गा यांनी पोलिसांत दाखल केली होती. मुख्य म्हणजे त्यानंतर दुर्गाच्या सासूबाईंनीसुद्धा दुर्गा यांच्या तक्रारीला उत्तर म्हणून आणखी एक तक्रार दाखल केली होती.
२८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करत पूजा करण्याचा अधिकार असल्याची बाब स्पष्ट केली होती. ज्यानंतर काही महिन्यांनी बिंदू अम्मिनी आणि कनक दुर्गा या दोघींनीही (५० वर्षांखालील) अय्यप्पा स्वामी मंदिरात जाऊन पूजा केली होती. केरळमध्ये विरोधकांचा तीव्र विरोध असतानाही त्यांनी उचलेलं हे पाऊल आणखी एक इतिहास रचणारं ठरलं होतं.