नवी दिल्ली : प्रेमात मित्र-मैत्रिणींना मदत करणं दोन तरुणांना महागात पडलं आहे. प्रेम प्रकरणात मदत करणाऱ्या दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील बोकारो जिल्हातील बालीडीह परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जबाबानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम सोरेन आणि राकेश सोरेन हे दोन तरुण आपल्या गावातील मित्र आकाश सोरेन याला प्रेम प्रकरणात मदत करत होते.
आकाश आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी टीटी रेललाईन परिसरात पोहोचला. त्यावेळी प्रेम आणि राकेशही त्याच्यासोबत होते. मात्र, मुलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आकाशने घटनास्थळावरुन पळ काढला मात्र, त्याचे मित्र प्रेम आणि राकेश यांना मुलीच्या नातेवाईकांनी पकडलं. नातेवाईकांचा राग इतका होता की त्यांनी प्रेम आणि राकेश यांची हत्या केली.
पोलीस उपअधिक्षक पूनम मिंज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश सोरेन याचे आणि आसीन सोरेन यांची पुतनी यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र, मुलीच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे आकाशला अद्दल घडवण्याचा प्लॅन आखण्यात आला. त्यानुसार आठ जून रोजी रात्री आकाशला भेटण्यासाठी राजेश रविदास, भुनेश्वर सोरेन, बैजनाथ सोरेन उर्फ बांके, छोटू हेम्ब्रम आणि चाकरी सोरेन दाखल झाले. सर्वांनी कुऱ्हाड, काठ्या घेऊनच घटनास्थळ गाठलं होतं.
आपल्यावर हल्ला होणार हे लक्षात येताच अंधाराचा फायदा घेत आकाशने तेथून पळ काढला. मात्र, त्याचे मित्र राकेश आणि प्रेम यांना मुलीच्या नातेवाईकांनी पकडलं. राकेश आणि प्रेम यांना बेदम मारहाण केली आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला.