Modi Comment On Hridaynath Mangeshkar Lost Job: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना संसदेत केलेल्या भाषणामध्ये बलराज सहानी व पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे उदाहरण देत काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावरुन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी या दोन्ही दिग्गजांचं नाव घेत थाप मारल्याचं म्हटलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखामधून ठाकरेंच्या शिवसेनेनं निशाणा साधला आहे.
"मोदी यांनी भाषणात बलराज सहानी व पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे उदाहरण दिले ते निरर्थक आहे. बलराज सहानी यांना काँग्रेसने तुरुंगात डांबले व मंगेशकरांनी वीर सावरकरांच्या गीतास संगीत साज चढवला म्हणून आकाशवाणीने त्यांना नोकरीतून काढल्याची थाप पंतप्रधान महोदयांनी संसदेत मारावी यासारखे दुर्दैव नाही. मोदी यांनी नीट माहिती घेऊन बोलायला हवे होते. कारण ते पंतप्रधान आहेत," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"बलराज सहानी हे एक सशक्त अभिनेते होते, पण त्यांचा संबंध कम्युनिस्ट म्हणजे डाव्या चळवळीशी होता. ते चळवळीत सक्रिय होते. प्रोगेसिव्ह रायटर्स संघटनेचे ते आधारस्तंभ होते. के. असिफ यांच्या ‘हलचल’ चित्रपटात त्यांना ‘जेलर’ची भूमिका साकारायची होती व त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन अनुभव घ्यायचा होता. पण योगायोग असा की, त्याच काळात मुंबईत डाव्यांचे एक जोरदार आंदोलन झाले होते. दंगल उसळली होती आणि आगी वगैरे लावल्या गेल्या होत्या. त्यावरून सामुदायिक अटका झाल्या. त्यात बलराज सहानी होते. तेव्हा सहानी यांची अभिनेता म्हणून फारशी प्रसिद्धी झाली नव्हती. त्यांना आर्थर रोड तुरुंगात नेले. काही दिवसांनी निर्माते के. असिफ त्यांना भेटायला जेलमध्ये आले व त्यांनी पोलीस आणि जेलरला वस्तुस्थिती सांगितली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सुटका होत नाही, हे खरे असले तरी बलराज सहानी जेलमध्ये होते तोपर्यंत रोज त्यांना ‘हलचल’च्या शूटिंगला तुरुंगातून जाण्याची सवलत सरकारने दिली होती व चाळीस दिवसांचे शूटिंग सहानी यांनी तुरुंगात असताना पूर्ण केले. हे आपल्या पंतप्रधानांना कोणी सांगितले नाही काय?" असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"मंगेशकरांचा संदर्भही अर्धसत्य आहे. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हेच ते वीर सावरकरांचे गीत संगीतबद्ध केले हृदयनाथांनी. त्यांची नोकरी या गाण्यामुळे गेली काय ते कोणी ठरवायचे? पण ‘सागरा प्राण तळमळला’ हे वीर सावरकरांचे गीत हजारो वेळा आकाशवाणीने वाजवले व आकाशवाणीमुळेच या गाण्यास लोकमान्यता मिळाली. पण पंतप्रधान मोदी या विषयावर ‘मन की बात’ सांगत आहेत," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.