Uddhav Thackeray Group On Manipur Unrest: "देशात जे काही चांगले घडते ते फक्त मोदी यांच्यामुळेच, असे त्यांचे भक्त नेहमीच सांगत असतात. मोदी स्वतःही तशीच प्रौढी मिरवत फिरत असतात. आताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून ते हेच करीत आहेत," अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने टीका केली आहे.
"काय तर म्हणे, मोदींच्या सरकारमुळेच मणिपूर शांत झाले! आसाममधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी असे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मणिपूरमधील परिस्थितीत बरीच सुधारणा झाली.’’ पंतप्रधानांचा हा दावा म्हणजे कांगावा तर आहेच, परंतु हिंसाचारग्रस्त मणिपुरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रकार आहे. मोदी यांच्यावर खोटारडेपणाचे आरोप सातत्याने का होतात, हे त्यांच्या या बेधडक दाव्यावरून लक्षात येते," असा टोला ठाकरे गटाने 'सामना'मधून लगावला आहे. "मणिपूर हे राज्य मागील वर्षभर जातीय आणि वांशिक हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. शेकडो निष्पाप लोकांचे बळी या हिंसाचाराने घेतले. हजारो कुटुंबे बेघर झाली. स्थलांतरित झाली. ईशान्य सीमेवरील अत्यंत संवेदनशील असलेले हे राज्य सलग काही महिने जळत असताना पंतप्रधान मोदी, त्यांचे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार काय करीत होते?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
"आज मोदी ‘वेळीच हस्तक्षेप’ केल्याच्या बढाया मारीत असले तरी त्या संपूर्ण काळात मोदी सरकारची अवस्था ‘कळूनही वळत नाही’ अशीच होती. रोम जळत असताना नीरो जसा बासरी वाजवीत बसला होता, तसे पंतप्रधान मोदी मणिपूर जळत असताना एकतर मौन बाळगून होते, नाहीतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात मग्न होते. अनेक मान्यवरांनी, विरोधी पक्षांनी त्या वेळी मणिपूरला भेट द्या, तेथील जनतेचे सांत्वन करा, तेही करत नसाल तर निदान काहीतरी बोला, असा रास्त आग्रह मोदी यांच्याकडे धरला होता, परंतु मोदी यांनी नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. हिंसाचारात सर्वस्व गमावलेली मणिपुरी जनता आक्रोश करीत होती, हस्तक्षेपाची याचना करीत होती. ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम हिनेदेखील ‘‘आम्हाला वाचवा’’ असा टाहो मोदींकडे फोडला होता. पण मोदींच्या कानाचे पडदे हलले नाहीत. लोकसभेतही पंतप्रधान म्हणून मोदींना मणिपूरवर तोंड उघडावे लागले ते ‘इंडिया’ आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणून मोदी सरकारचे नाक दाबले होते म्हणून," असं म्हणत मोदी सरकारच्या भूमिकेवरुन टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींना ठाकरे गटाने मणिपूरसंदर्भात एकूण 6 प्रश्न विचारले आहेत. "पुन्हा लोकसभेत मोदी मणिपूरवर किती बोलले? तर फक्त शेवटची चार मिनिटे. दोन तासांच्या भाषणात मणिपूरमधील गंभीर हिंसाचारावर फक्त चार मिनिटांत ओझरते भाष्य करणारे मोदी आज मात्र ‘‘आपण वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मणिपूरमधील परिस्थिती सुधारली’’ असा बिनधास्त आणि बेधडक कांगावा करीत आहेत. देशाचे एक संवेदनशील सीमावर्ती राज्य सलग वर्षभर वांशिक हिंसाचारात जळत असताना जे पंतप्रधान त्या राज्यात फिरकत नाहीत, लोकसभेतही फक्त चार मिनिटांची दखल घेतात, ते आज कुठल्या तोंडाने मणिपूरमधील परिस्थिती त्यांच्यामुळे सुधारली, असे म्हणू शकतात? जर मोदी म्हणतात त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमधील परिस्थिती सुधारली असेल तर मग मणिपूरचा मॅट्रिक्स मार्शल आर्ट फायटर चुंगरेंग कोरेन याने अलीकडेच मोदी यांना मणिपूरला भेट देण्याविषयी आर्जव का केले? देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडत असला तरी मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता का आहे? सुमारे 58 हजार मतदारांचा ठावठिकाणा का लागलेला नाही? राजकीय पक्ष, उमेदवार उघडपणे प्रचार करायला का धजावताना दिसत नाहीत? प्रचार सभांवर अघोषित बंदी का आहे? उमेदवार स्वतःची पोस्टर्स का लावू शकलेले नाहीत? पंतप्रधान मोदींकडे यापैकी एका तरी प्रश्नाचे उत्तर आहे का? आधी ते द्या आणि मग मणिपूरमध्ये नसलेल्या शांततेचे श्रेय लुटा. कश्मीर-लडाखपासून अरुणाचल-मणिपूरपर्यंत किती थापेबाजी कराल? मणिपूरपासून कश्मीरपर्यंत खदखद व हिंसाचार सुरूच असला तरी भारतीय नीरोचे बासरीवादन सुरूच आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.