नवी दिल्ली : भारतीय सीमाभागात अतिक्रमण करणं म्हणजे काही पोरखेळ नाही, अशा कडक शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमाभागात तणाव निर्माण करणाऱ्या चीन आणि पाकिस्तान या राष्ट्रांना एक प्रकारे थेट शब्दांत इशारा दिला आहे. ओडिशा जनसंवाद रॅलीला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते.
आमच्या कार्यकाळातही पुलवामा, उरी येथे दहशतवादी हल्ले झाले. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय़ घेण्यात वेळ दवडला नाही. पाकिस्तानला एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकनं त्याच क्षणी शिक्षाही देण्यात आली, याची आठवण करुन देत शाह यांनी साऱ्या जगालाच यातून एक समज पोहोचल्याचं स्पष्ट केलं.
'पाकिस्तानवर करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक पाहून, संपूर्ण जगापुढं हे स्पष्ट झालं असेल की भारतीय सीमेत अतिक्रमण करणं हा काही पोरखेळ नाही. या चुकीबद्दल शिक्षा ही होणारच...', अशा कठोर शब्दांत देशाच्या सीमेवर तणाव निर्माण करु पाहणाऱ्यांना इशारा दिला.
पाहा : कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी
इतकंच नव्हे, तर यावेळी शाह यांनी कोरोना मुद्द्यावरुन केंद्राच्या भूमिकांवर प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्री स्तरावरील काही दिग्गजांशी चर्चा करण्याचं सत्र सुरु केल्याचा मुद्दा अधोरेखित करत विरोधी पक्षानं अमेरिका, स्वीडन येथील लोकांशी चर्चा करणं आणि त्यांच्या मुलाखती घेण्याव्यतिरिक्त केलं काय, असा सवाल उपस्थित केला.
Terror attacks happened in our time too, in Uri & Pulwama, but PM Modi didn't waste time, Pakistan was punished by airstrikes & surgical strikes. It made the whole world realise that encroaching India's borders is not child's play, you will be punished: Home Minister Amit Shah pic.twitter.com/ttsmQPPpJx
— ANI (@ANI) June 8, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक राष्ट्र, एक जन और एक मन’ याच भावनेने कोरोनाविरोधातील लढाई सातत्यानं पुढे सुरुच ठेवली. परिणाणी आज देश चांगल्या स्थितीमध्ये आहे, असंही ते म्हणाले.