UP विधानसभा निवडणूक 2022 : स्वामींच्या विरोधात सिंह; योगींनी आखला मोठा डाव

भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी मंत्र्यांनी भाजप सोडून गेलेल्या मंत्र्यांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.  

Updated: Jan 25, 2022, 03:23 PM IST
UP विधानसभा निवडणूक 2022 : स्वामींच्या विरोधात सिंह; योगींनी आखला मोठा डाव title=

लखनौ : भाजपच्या मंत्र्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी मंत्र्यांनी भाजप सोडून गेलेल्या मंत्र्यांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही उमेदवाराची अदलाबदली झाली आहे उत्तर प्रदेश निवडणुकीत.

कुशीनगर जिल्ह्यातील पडरौना या जागेसाठी आता चुरशीची लढत होणार आहे. कारण, २०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी बंडखोरी करून समाजवादी पक्षात प्रवेश केला. स्वामी आता समाजवादी पक्षाच्या तिकिटावर येथून निवडणूक लढविणार आहे.

मात्र, ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. ही जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री योगी मोठी खेळी खेळत आहेत. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असून त्यांना मौर्य यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.

आरपीएन सिंह म्हणजेच रतनजीत प्रताप नारायण सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यूपीए सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री होते. पडरौना मतदार संघ हा एकेकाळी आरपीएन सिंह यांचा बालेकिल्ला होता. २००९ मध्ये लोकसभेचे खासदार म्हणून निवडून येईपर्यंत येथून तीन वेळा आमदार झाले होते. ते खासदार झाल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांचा या जागेवर प्रवेश झाला होता.

२००९, २०१२ मध्ये विजयी झालेले मौर्य यांनी २०१७ च्या निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला. यावेळीही ते विजयी झाले. आता त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून त्यांच्याविरोधात भाजप आरपीएन सिंह यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.