नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने एक नवीन विशिष्ट्यपु्र्ण निर्णय घेतला आहे.
मथुरेतील वृंदावन नगर पालिका परिषद आणि नगर पंचायत बरसानाच्या अधिसूचित क्षेत्राला पवित्र तीर्थस्थान म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर मथुरा पोलिसांच्या वर्दीत देखील बदल करण्यात येणार आहे. मी़डिया रिपोर्टनुसार, मथुरा पोलिसांच्या वर्दीवर लवकरच भगवान श्रीकृष्णांचा बॅच दिसेल. पर्यटन पोलीस असे देखील लिहिलेले असेल. व पोलीसांच्या वर्दीवर त्यांच्या रॅंकनुसार बिल्ला असेल.
यूपी पोलीस टूरिस्ट फ्रेंडली असल्याचे दाखवणे हा यामागचा उद्देश असेल. काही दिवसांपुर्वी फत्तेपूर सिकरीमध्ये स्विस कपलची छेडछाड आणि मारमीटीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर यूपी पोलीसांवर बरीच टीका झाली. म्हणून ही दूषित प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीसांनी वर्दीत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र या प्रस्तावाला डीजीपींकडून हिरवा कंदील मिळण्याची वाट पाहत आहेत.
तर एकीकडे पोलीसांच्या वर्दीवरील या नव्या लोगोबाबत टीकास्त्र उठले आहे. यामुळे धर्मनिरपेक्षततेला ठेच पोहचेल, असे अनेकांचे म्हणणे आहे. कॉंग्रेस प्रवक्ता विवेक बंसल यांनी सांगितले की, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून सरकारने अशाप्रकारे कोणत्याही धर्माचा प्रचार करू नये. कॉंग्रेसच्या आग्रा शाखेचे अध्यक्ष हाजी जमिलुद्दीन कुरैशी यांनी हा निर्णय म्हणजे संविधानाचे उल्लंघन असल्याचे सांगितले.