शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी एका सात वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूचं कारण संतापजनक आहे. क्रिकेटचा (Cricket) सामना पाहण्यात डॉक्टर व्यस्त असल्याने मुलीवर उपचार करण्यास त्यांनी नकार दिल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधल्या बदायूच्या शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. 7 वर्षांच्या सोफिया नावाच्या मुलीला उपचारासाठी बदायू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोफियाचे वडिल नाजिम गंभीर अवस्थेत मुलीला घेऊन शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचले. पण डॉक्टरांनी मुलीवर उपचार करण्यास नकार दिला. उपचाराअभावी या मुलीचा अखेर मृत्यू झाला.
नाजिम हे मुलीवर उपचारासाठी डॉक्टरांना विनवी करत होते. पण अनेक तास उलटल्यानंतरही डॉक्टर त्या मुलीकडे फिरकलेही नाहीत. रुग्णालयातील डॉक्टर्सने मुलीवर उपचार करण्यास चक्क नकार दिला. डॉक्टर टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहाण्यात दंग होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यादरम्यान मुलीची प्रकृती आणखी खालावली, अखेर आईच्या कुशीतच मुलीने अखेरचा श्वास घेतला. मुलीच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आरोपी डॉक्टरांवर कठोर कारवाई मागणी आता केली जात आहे.
चौकशीसाठी समिती स्थापन
मुलीच्या मृत्यूनंतर घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला. मीडियाने वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाला याचा जाब विचारला. यावर डॉक्टर अरुण कुमार यांनी घटना खूपच दु:खदी असल्याचं सांगत याप्रकरणाच्या तपासासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीने अहवाल सादर केल्यानंतर डॉक्टरांवर आवश्यकती कठोर कारवाई केली जाणार आहे.
बदायूचे माजी खासदार धर्मेंद्र यादव यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या प्रकरणाची निंदा केली आहे. मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोपी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
बदायू शासकीय रुग्णालयात सात दिवसांचा फेस्ट आयोजित करण्यात आला होता. यात क्रिकेटसह इतर खेळ तसंच इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात रुग्णालयातील डॉक्टर्स आणि शिकावू डॉक्टरसही सहभागी झाले होते. या फेस्टमध्ये क्रिकेटचा सामना खेळवला जात होता, तो खेळण्यात आणि पाहण्यात डॉक्टर व्यस्त होते.