Char Dham Yatra News: उत्तराखंड सरकारने चार धाम मंदिरांच्या 50 मीटरच्या परिसरात रील व व्हिडिओग्राफी करण्यावर बंदी घातली आहे. यासंबंधी उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव राधा रतूडी यांनी एक आदेश जारी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, प्रशासन रिल बनवणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. जे लोक चारधाम यात्रेसंदर्भात रील बनवून चुकीच्या सूचना किंवा अफवा पसरवत आहेत. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश देत हे नियम लागू केले आहेत.
उत्तराखंडचे मुख्य सचिन राधा रतूडी यांनी पर्यटन सचिव गढवाल मंडलचे कमिश्नर, एसपी आणि जिल्हा कलेक्टर यांन याबाबत आदेश दिले आहेत. आतापासून मंदिरांच्या 50 मीटर परिसरात व्हिडिओग्राफी न करण्याचा व सोशल मीडियावर रिल्स न बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रील्स आणि सोशल मीडियामुळं तीर्थयात्रेसाठी आलेल्या लोकांना समस्या निर्माण होतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या जातात.
चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. या दरम्यान काही जण मंदिर परिसरात रिल्स बनवण्यासाठी व व्हिडिओग्राफी करण्यासाठीदेखील येतात. या रिल स्टारमुळं तीर्थयात्रींना खूप त्रास होतो. कधीकधी या रिलस्टारमुळं भाविकांना देवाचे दर्शनही नीट करता येत नाही. त्यामुळं नाहक मनस्ताप होतो. ही समस्या पाहता उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मुख्य सचिवांनी हे देखील म्हटलं आहे की, रीलच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. चुकीच्या माहितीसोबत रील बनवणे आणि सोशल मीडियावर अपलोड करणे हा एक अपराध आहे. जर तुम्ही मोठ्या श्रद्धेने चारधाम यात्रेसाठी जातात तर मंदिरांजवळ अशापद्धतीचे रील बनवणे खूप चुकीचे आहे. यातून हे देखील लक्षात येते की तुम्ही श्रद्धा मनात ठेवून आला नाहीयेत. त्याचबरोबर जे लोक खरंच दर्शनासाठी आले आहेत त्यांच्या भावनादेखील तुम्ही दुखावता. त्यामुळं आता अशापद्धतीने रिल्स बनवणाऱ्यांवर कठोर कारवाईदेखील होणार आहे.
चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जेणेकरुन सर्व भाविक आरामात चारधामचे दर्शन करु शकणार आहेत.