मदरशावरील कारवाईनंतरच्या हिंसाचारात चौघांचा मृत्यू, 100+ पोलीस जखमी; Shoot At Sight चे आदेश

Haldwani Violence: मदरशावरील कारवाईनंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण राज्यामध्येच हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 9, 2024, 09:24 AM IST
मदरशावरील कारवाईनंतरच्या हिंसाचारात चौघांचा मृत्यू, 100+ पोलीस जखमी; Shoot At Sight चे आदेश title=
राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे

Uttarakhand Haldwani Violence: उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या बनभुलपुरा परिसरामध्ये गुरुवारी बेकायदा मदरसा जमीनदोस्त करण्याच्या मुद्दावरुन हिंसाचार उसळला. यानंतर या ठिकाणी झालेली दगडफेक आणि हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. या ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे म्हणजेच शूट अॅट साईटचे आदेशही जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हिंसाचारामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

मोठ्या संख्येनं स्थानिक जमले अन्...

मदरशावर कारवाई केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांची जाळपोळही करण्यात आली. यामध्ये 100 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मदरशावर कारवाई करण्याच्या आधी नागरिकांना आधी माहिती देण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रल्हाद वाणी यांनी दिली आहे. मदरसा अतिक्रम केलेल्या जमिनीवर उभारण्यात आला होता, असंही पोलिसांनी सांगितलं. कारवाईसाठी पोहोचलेल्या पथकावर स्थानिक मोठ्या संख्येनं गोळा झाले. मदरशावर बुलडोझर चालवल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. 

100 हून अधिक पोलीस जखमी

हल्द्वानीमधील बनभुलपुरा येथील हिंसाचारामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) ए. पी. अनुशमन यांनी दिली आहे.  

इंटरनेट सेवा, शाळा बंद

हल्द्वानीमधील हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असं नैनिताल जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

राज्यामध्ये हाय अलर्ट

संपूर्ण राज्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तराखंड सरकारने दिली आहे.

अतिरिक्त पोलीस तैनात

सध्या हल्द्वानीच्या बनभुलपुरामध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या ठिकाणी अनेक वाहने जाळण्यात आली आहे. या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.