गांधीनगर: तुम्ही जर पाणीपुरीचे शौकीन असाल आणि नजीकच्या काळात गुजरात किंवा वडोदाच्या दौऱ्यावर असाल तर सावधान! तुमच्यासाठी काहीशी नाराज करणारी बातमी आहे. वडोदरा नगरपालिकेने शहरात पाणीपुरीवर बंदी घातली आहे. त्यामुळे असंख्य पाणीपुरी चाहत्यांच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार पावसाळ्यात होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी पाणीपुरीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेचे म्हणने असे की, पाणीपुरी विक्रेते पाणीपुरी बनवताना योग्य ती स्वच्छता ठेवत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो. पाणीपुरी खाल्ल्यामुळे लोकांना टायफॉईड, काविळ तसेच, अन्नातून विषबाधा असे आजार जडल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरी बनवणाऱ्या काही ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत वडोदरा आरोग्य विभागाने सुमारे ५० ठिकाणी केलेल्या छापेमरीत ४ हजार किलो पाणीपुरी. ३ हजार ५०० किलो बटाटे आणि काबुली चने आणि १२०० लीटर पाणीपुरीचे मसालेदार (चटपटीत) पाणी जप्त केले आहे.