नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान बाजपच्या मुख्यालयात सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर बूट भिरकावल्याचा प्रकार समोर आलाय. भाजपाच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर बूट फेकण्यात आला. जीव्हीएल नरसिंहराव हे भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत. नरसिंह राव जेव्हा पत्रकार परिषदेत बोलत होते तेव्हा अचानक एका व्यक्तीनं त्यांच्यावर बूट भिरकावला. यावेळी नरसिंह राव यांच्या बाजुला भूपेंद्र यादवदेखील बसले होते.
ज्यावेळी बूट भिरकावण्यात आला तेव्हा नरसिंह राव लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्यासंबंधी प्रतिक्रिया देत होते.
ज्या व्यक्तीनं बूट फेकला त्याला सुरक्षा रक्षकांनी तातडीनं ताब्यात घेतलंय. शक्ती भार्गव असं बूट फेकणाऱ्याचं नाव आहे. सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे आढळलेल्या व्हिजिटींग कार्डवर हे नाव नमूद करण्यात आलंय. डॉ. शक्ती भार्गव हा उत्तर प्रदेशातल्या कानपूरचा रहिवासी आहे.
डॉ. शक्ती भार्गव यानं आपल्या फेसबुक अकाऊंटवर स्वत:चा उल्लेख 'व्हिसल ब्लोअर' (अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा आवाज उचलणारा) असा केलाय. सोशल मीडियावर, पीएसयू कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसाठी त्यानं सरकारला जबाबदार धरलंय. कानपूरमध्ये बंध झालेल्या कारखान्यांसाठीही शक्ती भार्गव यानं आवाज उठवलाग होता.
डॉ. शक्ती भार्गव यानं भाजप नेत्यांवर बूट का फेकला? त्याबद्दल चौकशी सुरू आहे.