Viral girl Monalisa: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्यात लाखो भाविकांनी आतापर्यंत पवित्र स्नान केलं आहे. महाकुंभमेळ्याला हजेरी लावणारे अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये निळ्या रंगाची मोनालिसाही आहे. पण हे व्हायरल होणं मोनालिसाला त्रासदायक ठरलं आहे. हे इतकं त्रासदायक झालं की तिने महाकुंभमेळावा सोडला आहे. लवकरच ती मध्य प्रदेशच्या महेश्वर येथील आपल्या घरी पोहोचेल. मोनालिसान सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत व्हायरल गर्लने हा दावा केला आहे.
मोनालिसाने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लिहिलं आहे की, "कुटुंब आणि माझ्या सुरक्षेसाठी मला पुन्हा इंदोरला जावं लागत आहे. शक्य झाल्यास पुढील शाही स्नानाला आपली भेट होईल. तुमच्या पाठिंबा आणि प्रेमासाठी आभार".
यासह ती व्हिडीओत सांगत आहे की, "हॅलो गाईज, मी आता थोड्या वेळात महेश्वरला पोहोचणार आहे. जर मदत मिळाली तर पुढील स्नानाला लवकर जाईल. तुम्ही काळजी घ्या. मला असंच प्रेम देत राहा आणि व्हिडीओ शेअर करत राहा".
आपल्या निळ्या डोळ्यांमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेली मोनालिसा मध्य प्रदेशच्या खरगोना जिल्ह्यातील महेश्वरची राहणारी आहे. मोनालिसाचे पूर्वज राजस्थानच्या चित्तोडगड मधून 150 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात आले होते. घुमन्तु कुटुंबातील मोनालिसाचे पूर्वज जवळपास 30 वर्षापूर्वी महेश्वर येथे येऊन स्थायिक झाले. व्हायरल गर्लचं कुटुंब रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा, शिवलिंग असं साहित्य मेळाव्यांमध्ये विकून आपलं पोट भरतं.
मोनालिसाच्या कुटुंबात आई-वडिलांस तिची छोटी बहीण आणि दोन भाऊ आहेत. मोनालिसाचं मोजकं शिक्षण झालं आहे. देशभरातील मेळाव्यांमध्ये हे बहिण भाऊ, आई-वडील माळा, रुद्राक्ष विकतात. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोनालिसासह तिचं कुटुंब माळा विकताना अडचणींचा सामना करत होतं. लोक माळा खरेदी करण्यापेक्षा मोनालिसासह फोटो काढण्याची गर्दी करत होते. यामुळे मोनालिसाला घरी पाठवण्यात आलं.