चेन्नई : आपण बऱ्याच लोकांना असं बोलताना ऐकलं असेल की, त्यांना कामाच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नाही, ज्यामुळे ते आपल्या बॉस विरुद्ध काही अपशब्द बोलतात किंवा या सगळ्याची कम्प्लेंट करतात. परंतु तुम्हाला माहितीय का अजूनही अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना विविध मार्गांनी प्रोत्साहन देण्यासाठी मागेपुढे पाहात नाहीत. जो कर्मचारी कंपनीला जास्त प्रॉफिट करुन देतो, त्या कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी गिफ्ट देते.
त्यात अशी एक कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश होऊन त्यांना चक्क कार गिफ्ट करत आहे. जे खरोखरंच कौतुकास्पद आहे.
चेन्नईची आयटी कंपनी Ideas2IT ने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना मारुती कार भेट दिल्या आहेत. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या कारमध्ये मारुती इग्निस, मारुती स्विफ्ट, मारुती बलेनो, मारुती ब्रेझा, मारुती एर्टिगा आणि मारुती एक्सएल अशा 6 गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीने अन्य काही कर्मचाऱ्यांनाही भेटवस्तू मिळाल्या आहेत. त्यांना सोन्याची नाणी आणि आयफोन गिफ्ट मिळाले आहेत.
कर्मचार्यांना कार आणि इतर भेटवस्तू देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये Ideas2IT चे CEO गायत्री विवेकानंदन स्वतः उपस्थित होते.
यावेळी बोलताना विवेकानंदन म्हणाले, "आपल्या कर्मचार्यांनी कंपनीच्या वाढीमध्ये आपले योगदान दिले आहे. ज्यामुळे Ideas2IT ने या लोकांना प्रोत्याहीत करण्यासाठी ही अनोखी पद्धत स्वीकारली आहे. कर्मचाऱ्यांना या गाड्या भेट देणे हे या दिशेने पहिले पाऊल आहे. Ideas2IT आगामी काळात असे आणखी उपक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे."
भेटवस्तू म्हणून कार मिळाल्यानंतर उत्साहित झालेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, "संस्थेकडून भेटवस्तू मिळणे नेहमीच छान असते. कंपनी प्रत्येक प्रसंगी सोन्याची नाणी आणि आयफोन सारख्या भेटवस्तू देऊन कर्मचाऱ्यांसोबत आनंद शेअर करते. कार ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे."
कंपनीने कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी, चेन्नईच्या आणखी एका आयटी कंपनीने, किसफ्लो इंकनेही असाच एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. या कंपनीने गेल्या आठवड्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांना BMW कार भेट दिल्या.
या 5 कर्मचार्यांना याची आधी कल्पनाही नव्हती. त्याला काही तासांपूर्वीच या सरप्राईज गिफ्टची माहिती मिळाली. या पाच भाग्यवान कर्मचाऱ्यांना कंपनीच्या सीईओकडून BMW 530d मॉडेल भेट देण्यात आले. नेव्ही ब्लू 5 सीरिजच्या या गाड्यांची किंमत 1 कोटी रुपये आहे.