नवी दिल्ली : मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचाय वापर मोठ्या प्रमाणात वाढला. खासगी कारणांपासून ते अगदी व्यावसायिक कारणांपर्यंत सर्वच बाबतीत सोशल मीडियाचं महत्वपूर्ण योगदान पाहिलं गेलं. पण, याचा चुकीच्या मार्गांनीही वापर केला गेला. सध्या याचंच एक उदाहरण व्हायरल पोस्टच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे एका तरुणांच्या गँगनं चक्क गुन्हेगारी सेवा देण्यासाठी त्यांचं रेटकार्डच प्रसिद्ध केल्याचं पाहायला मिळत आहे. अपलोड करण्यात आलेल्य़ा काही फोटोंपैकी एकामध्ये तरुण पिस्तुल पकडून दिसत आहे. सोबतच धमकी, मारहाण, हत्या अशा सेवांसाठी किती पैसे आकारले जातात याचे दरही इथं सांगितले गेल्याचं पाहायला मिळत आहे.
धक्कादायक असा हा प्रकार सध्या अनेकांच्या भुवया उंचावत आहे. कारण यामध्ये धमकी मारहाणीसोबतच कोणाचातरी जीव घेण्याचं कामही स्वीकारलं जाण्याबाबतची एक प्रकारे जाहिरात करण्यात आली आहे. या तक्त्यात नमूद केल्यानुसार धमकी देण्यासाठी १ हजार रुपये, मारहाण करण्यासाठी ५ हजार रुपये, कोणा एकाला जखमी करण्यासाठी १० हजार रुपये आणि हत्या करण्य़ासाठी ५५ हजार रुपये आकारले जातील असं स्पष्ट करण्य़ात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी या पोस्टची माहिती मिळताच तपास केला असता हा युवक चौकाडा गावचा असल्याची बाब समोर आली असून, त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचीही चिन्हं आहेत.