Mahakaleshwar Temple Viral Video: मंदिरात दर्शन घेताना व्हीआयपींना रांगेत उभं न राहता थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन दिलं जात असल्याचं आपण सर्वांनीच अनेकदा पाहिलं आहे. यावर अनेकदा काहीजण आक्षेपही घेतात. पण मंदिरात वाद नको म्हणून अनेकजण शांत राहणं पसंत करतात. पण मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये (Ujjain) असणाऱ्या महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) मात्र एका महिलेने याचा विरोध करत मंदिर व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे.
महाकाल मंदिरात 19 मार्चला एका महिलेने बॅरिकेड्सवरुन उडी मारुन जात गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. शंकराच्या पिंडीवर जल अपर्ण करत तिने दर्शन घेतलं. महिलेला रोखण्याचा सुरक्षारक्षकांनी फार प्रयत्न केला. पण संतापलेल्या महिलेला रोखण्यात त्यांना यश आलं नाही. मंदिरातील व्यवस्थापनावर महिलेने तीव्र नाराजी जाहीर केली. महिलेने दर्शनासाठी दिल्या जात असलेल्या 1500 रुपयांच्या पावतीवरही प्रश्चचिन्ह उपस्थित केलं.
19 मार्चला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भक्त दर्शन घेत असताना एका वयस्कर महिलेने जोरदार गोंधळ घातला. महिलेने 3.5 फुटांच्या बॅरिकेडवरुन उडी मारुन गणेश मंडपातून थेट नंदी हॉलमध्ये प्रवेश केला. यानंतर महिला थेट गाभाऱ्यात केली आणि दर्शन घेऊन बाहेर पडली.
महिला ज्या रांगेत उभं राहून दर्शन घेत होती त्यासाठी 250 रुपयांची पावती फाडली होती. त्या रांगेत दुरुनच दर्शन मिळत होते. पण 1500 रुपयांची पावती फाडणाऱ्यांना गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्यास मिळत होतं. हे पाहिल्यानंतर महिला संतापली आणि त्यांनी यावर प्रश्न उपस्थित करत बॅरिकेड ओलांडलं.
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात एका वयस्कर महिलेने गोंधळ घातला. 1500 रुपयांची पावती फाडणाऱ्यांना गाभाऱ्यातील दर्शन होत असल्याने महिलेने रांग तोडून व्हीआयपी रांगेत प्रवेश केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने खडे बोल सुनावले #Mahakaleshwar Ujjain #viralvideo pic.twitter.com/SMbdXe4WGn
— Shivraj Yadav | शिवराज यादव (@shiva_shivraj) March 25, 2023
महिला बॅरिकेड ओलांडत असल्याचं पाहून एक पोलीस कर्मचारी धावत आला. पण महिलेने त्याला जुमानलं नाही. महिलेने बॅरिकेडवरुन उडी मारल्यानंतर एक सुरक्षा कर्मचारी आणि मंदिरातील कर्मचारी धावत आले. पण महिला त्यांचंही ऐकून घेण्यास तयार नव्हती. महिलेने जोरजोरात गोंधळ घालत मंदिराच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 1500 रुपयांची पावती घेणाऱ्यांमुळे आपण बाबांचे दर्शन करु शकत नाही आहे. मंदिरातील लोक दर्शनासाठीही 1500 रुपये घेत आहेत असा संताप तिने व्यक्त केला.
तुम्ही काळा धंदा करत असून सर्वांना दर्शन मिळालं पाहिजे असं महिला ओरडून सांगत होती. दरम्यान व्हिडीओत ऐकू येत आहे त्याप्रमाणे महिलेने कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी महिलेने केलं ते योग्य असल्याचं म्हटलं आहे.
महाकालेश्वर मंदिरात शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस फक्त त्याच भक्तांना प्रवेश दिला जातो, जे 1500 रुपयांचा पावती फाडतात. याशिवाय मंगळवार ते शुक्रवार दुपारी 12.30 ते 4.30 पर्यंत सर्व भक्तांनी विनाशुल्क गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. शनिवार, रविवार आणि सोमवार गर्दी असल्याने सामान्य भक्तांना गाभाऱ्यात जाऊ दिलं जात नाही.