गायत्री पिसेकर, झी मीडिया, मुंबई: International astronomy day : आज 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस साजरा केला जात आहे. जगभरामध्ये हा दिवस वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. एकदा स्प्रिंग म्हणजेच साधारण एप्रिल-मेमध्ये (वसंत ऋतू) आणि एकदा फॉल म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात (शरद ऋतू) हा दिवस साजरा केला जातो. कारण शक्यतो या कालावधी आकाश साफ असतं. खगोलप्रेमींनी यादिवशी आवर्जून आकाशाचं निरीक्षण करून विश्वातील खगोलीय चमत्कार पाहावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
खगोलशास्त्र म्हणजे पृथ्वी या गृहगोलाच्या, वातावरणाच्या पलीकडे असलेल्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास. त्यामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. तसेच याव्यतिरिक्त दुर्बिणी किंवा इतर उपकरणांनी दिसणार्या ऑबजेक्टच्या अभ्यासाचा समावेश आहे. दूरवर दिसणारी आकाशगंगा, अगणित दिर्घिका, अलीकडे फोटो कॅप्चर केलेले ब्लॅक होल्स, नेब्युला, धुमकेतू, एस्टेरॉईड बेल्ट आणि धूलीकण अंतराळातील या सगळ्याच गोष्टीचा अभ्यास खगोलशास्त्रात करतात.
संशोधन खगोलशास्त्रज्ञ होण्यासाठी भौतिकशास्त्र किंवा खगोलशास्त्रात (doctorate degrees in physics) डॉक्टरेट पदवी असणं आवश्यक आहे. 12वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र (Physics/Applied Physics) घेऊन B.Sc पदवी पूर्ण करा. पुढे तुम्ही भौतिकशास्त्रात मास्टर डिग्री M.Sc करू शकता.
नासा (NASA), इस्रो (ISRO), कॅनडियन स्पेस एजन्सी (Canadian Space Agency), युके(UK Space Agency) इसा(Israel Space Agency) यासारख्या स्पेस एजन्सीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता.
इस्रो (ISRO) मध्ये शास्त्रज्ञ (Scientist) किंवा अभियंता (Engineer) म्हणून नोकरी मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी B.Sc. फर्स्ट क्लास असणं आवश्यक. (निवड केवळ लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित असेल. कौशल्य चाचणी ही केवळ पात्रता स्वरूपाची असते.) तसेच इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यावर ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.