Latest Weather Updates : महाराष्ट्रातून थंडीनं काढता पाय घेतला. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर, देशातील काही राज्यांमध्येही थंडीचं प्रमाण कमी झालं, अतीव उत्तरेकडील राज्य मात्र इथं अपवाद ठरली. तर, दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या हवामानाचं वेगळं आणि तितकंच रौद्र रुप पाहायला मिळत आहे. ज्या केरळाच्या वेशीवर देशातील मोसमी पावसाचे वारे अर्थात मान्सून पहिलं पाऊल ठेवतो त्याच केरळात आता उष्णतेच्या लाटा येण्यास सुरुवात झाली आहे. केरळमध्ये गेल्या काही काळापासून तापमानात होणाऱ्या वाढीमुळं आता राज्य शासन सतर्क झालं असून, त्यांनी राज्यातील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.
केरळमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं एक इशारा देण्यात आला आहे. जिथं कन्नूर, कोट्टायम, कोझिकोडे आणि अलापुझ्झा जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यहून जास्त असेल असा इशारा देण्यता आला आहे. शनिवारीसुद्धा या भागामध्ये तापमानाचा आकडा जास्तच नोंदवण्यात आला होता.
राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्द यांनीही नागरिकांना सतर्क राहत या उष्णतेच्या लाटेमध्ये स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता उष्माघात आणि उन्हाळ्यातील आजारांचा धोका लक्षात घेता पुरेसं पाणी प्या, दिवसातील उष्ण तापमानाच्या वेळांमध्ये घराबाहेर जाणं टाळा असा सल्ला दिला आहे. शिवाय सुती आणि सैल कपडे घाला, फळं आणि सॅलडचा आहारात समावेश करा अशाही मार्गदर्शक सूचना केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी केल्या आहेत.
केरळमध्ये दिवसा वाढत जाणारं तापमान पाहता शाळांमध्ये पाणी पिण्यासाठी घंटा वाजवल्या जाणार असल्याचा विचार राज्य शासन करताना दिसत आहे. Water Bell संकल्पनेअंतर्गत विद्यार्थी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुरेसं पाणी घेत आहेत हे सुनिश्चित करण्यात येणार आहे. या नव्या संकल्पनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10.30 आणि दुपारी 2.30 वाजता Water Bell वाजवण्यात येईल.
केरळमध्ये उष्णतेच्या लाटेनं हाहाकार माजवण्यास सुरुवात केलेली असतानाच महाराष्ट्रावरही याचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमान सर्वसामान्यपेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अनेक भागांमध्ये उन्हाचा दाह अधिक तीव्र होताना दिसत आहे. तेव्हा उन्हाळ्याच्या धर्तीवर तुम्हीही तयारीला लागणं योग्य असेल.