नवी दिल्ली : देशातील सर्वच जनता सध्या महामारीचा सामना करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत देशाला खरंच नव्या संसदेची गरज आहे का? असा प्रश्न अभिनेते आणि मक्कल निधी माईम पक्षाचे नेते कमल हसन यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना प्रश्नविचारला. १० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. यासाठी जवळपास ९७१ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कमल हसन ट्विट करत म्हणाले की, 'जेव्हा चीनच्या भिंतीची निर्मिती होत होती तेव्हा अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. पण लोकांच्या सुरक्षेसाठी भिंत उभारणं गरजेचं होतं असा दावा त्यावेळच्या प्रशासनाने केला.' असं ते म्हणाले.
शिवाय सध्या भारतात नव्या संसदेसाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येत आहेत. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येक लोकांना उपाशी राहवं लागलं. अशा परिस्थितीत देशाला खरंच नव्या संसदेची गरज आहे का? असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेचे अधिवेशन नवीन इमारतीत आयोजित केले जावे यासाठी नवीन संसद भवन ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. नवीन संसद भवनात लोकसभा सध्याच्या सभागृहापेक्षा तीन पट मोठी असेल. राज्यसभेचा आकारही वाढेल. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड एकूण ६३,५०० चौरस मीटर क्षेत्रावर नवीन संसद भवन बांधणार आहे.