अहमदाबाद : भाजप नेते दरवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही असे म्हणताहेत. शिवसेना तीच आहे. पण बघणाऱ्यांची दृष्टी बदलली आहे. जर, बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नसेल तर मग वाजपेयी, अडवाणींच्या काळातली तरी भाजप आता कुठे राहिलीय? असा परखड सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपने टीका केलीय. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, अहमदाबादला आम्ही स्वखर्चाने आलो आहोत. तिकडे पोहचल्यावर मी न बोलताच अचानक इकडं उलट्या व्हायला लागल्या आहेत. तिकडच्या प्रशासन, महापौरांना आम्ही कल्पना दिली होती. त्यांनी चांगले करून जिलेबी,फाफडा..किशोरीबेन आपला..असं ते म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.
डोकी फोडू, दंगली करू असं वक्तव्य काही जण करत आहेत. मात्र, आम्ही विकासावरच बोलणार. मुक्या प्राण्यांवरून राजकारण करणं आम्हाला आवडत नाही. पण, राजकारणासाठी मुंबईला बदनाम केलं जात आहे.
आदित्य ठाकरेंना युवराज पेंग्विन म्हणून हिणवले गेले. मग आशिष शेलार,भातखळकरांना गुजरात पेग्विन म्हणायचे का? कांगारू उडी मारणाऱ्या चिवाताईनी पेडणेकर नव्हे तर पेंग्विनकर म्हटले. मी हे नाव स्विकारते. पण, तुम्हाला गुजरात पेंग्विन म्हणायचे का? असा टोला त्यांनी लगावला.
गुजरातमध्ये २६४ कोटी खर्च करून मत्स्यालय उभं केलं. तिथं पेंग्विन ठेवले. तिथं ६ पेंग्विन आणले पण आता ५ पेंग्विन आहेत. मग, एक पेंग्विन कुठे गेले? मुंबईत मात्र संसर्गामुळे एक पेंग्विन मृत्यू पावल्यावर किती गहजब केला. तिथं पेंग्विनवरून कुठलाही वाद नाही, मग इथेच एवढा वाद का? असा सवाल महापौरांनी केला.
पेंग्विन सांभाळणारे अनुभवी डॉक्टर तिथे नाहीत. जर काही समस्या आली तर ते आमच्या राणीबागेतल्या अधिकाऱ्यांडून मदत मागतात. त्यांनी चांगले केलं आहे. पण तिकडे प्रत्येक विभागासाठी २०० रूपये फी आहे. पण, आम्ही पूर्ण कुटुंबाला १०० रूपयांत राणीबाग बघायला देतो. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाना फ्री सेवा आहे. परंतु तिथं नाही. प्रत्येक गोष्टीला तिथं पैसे घेतात, त्या तुलनेत अधिक चांगले मुंबईत आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.