लाठी : गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत. लाठीमध्ये झालेल्या सभेमध्ये राहुल गांधींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं राहुल गांधी म्हणालेत.
काँग्रेसचं सरकार आल्यावर १० दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीचं धोरण तयार करू असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. २२ वर्ष मोदी शेतकऱ्यांविषयी बोलत आहेत, पण तुम्हाला काहीच मिळालं नाही. उलटं तुमची जमीन घेतली गेली. तुमचं पाणी उद्योजकांना देण्यात आलं. शेतकऱ्यांना पीक विमाही मिळत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली त्यांच्या पाच-दहा मित्रांचं १.२५ लाख कोटींचं कर्ज माफ करतात. पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं आमचं धोरण नसल्याचं जेटली म्हणतात, असा टोला राहुल गांधींनी लगावला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे रबर स्टॅम्प आहेत. अमित शहा गुजरातचे रिमोट कंट्रोल असल्याची टीका राहुल गांधींनी केली.