Credit Card Alert: क्रेडीट कार्डमुळे वस्तू खरेदी करणं सहज सोपं होतं. तसेच वस्तू घेताना सवलती मिळत असल्याने आकर्षण वाढतं. त्यामुळे अनेक जणांना आपल्याकडे क्रेडीट कार्ड (Credit Card) असावं असं वाटतं. कारण पैसे नसले की क्रेडीट कार्डच्या मदतीने तुम्ही खरेदी करु शकता. क्रेडीट कार्डचे पैसे भरण्यासाठी ठरावीक अवधी मिळतो. त्या कालावधीत पैसे भरल्यास अतिरिक्त व्याज भरावा लागत नाही. यामुळे गेल्या काही वर्षात क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण क्रेडीट कार्ड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते देखील एक प्रकारचं कर्ज आहे. त्यामुळे क्रेडीट कार्ड घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात पश्चाताप होणार नाही.
क्रेडीट कार्ड घेताना विचार करा- कोणीही सांगितलं म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ नका. आपल्याला खरंच गरज आहे का? याबाबत विचार करा. तुमच्याकडे एक क्रेडिट कार्ड असताना दुसरे क्रेडिट कार्ड घेतलं तर अडचण वाढेल. कारण क्रेडिट कार्डमुळे अतिरिक्त खर्च वाढतो. जर तुम्ही वेळेत खर्च केलेल्या रकमेची भरपाई करू शकत नसाल तर व्याजाच्या चक्रव्यूहात अडकाल.
30 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करू नका- तुमच्या क्रेडीट कार्ड असेल तर ते वापरणं ही देखील एक कला आहे. प्रत्येक क्रेडिट कार्डला मर्यादा असते. ही मर्यादा हजारांपासून लाखांपर्यंत असू शकते. तुम्ही कधीही मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू नका. क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या फक्त 30 टक्के रक्कम खर्च करावी, असे बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे.
क्रेडीट कार्ड बंद करताना- अनेक वेळा दोन कार्डे असताना लोक एक कार्ड अचानक बंद करतात. असं करू नका. यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढू शकतो. कारण याआधी हा रेशो पूर्वी दोन कार्डमध्ये विभागलेला होता. एक कार्ड बंद केल्यानंतर त्याचा भार दुसऱ्या कार्डवर येईल. उच्च क्रेडिट वापर गुणोत्तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करते. म्हणूनच तुम्ही कार्ड वापरत नसला तरी ते सक्रिय ठेवा.
रोख रक्कम- अडचणीच्या काळात तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डमधूनही पैसे काढता. परंतु क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे पूर्णपणे टाळले पाहिजे कारण यासाठी तुम्हाला जास्तीचे शुल्क द्यावे लागते. याशिवाय कॅश अॅडव्हान्सवर व्याजमुक्त क्रेडिट कालावधीचा कोणताही लाभ मिळत नाही.