रायगड: किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी राजकीय घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी संध्याकाळी माफीनामा सादर केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरत गोगावले यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. यावेळी त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. परंतु, यावेळी भरत गोगावले यांच्या काही कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर चढून राजकीय घोषणा दिल्या होत्या.
ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भरत गोगावले यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समाधी आणि रायगडाचे पावित्र्य जपणे ही सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. समाधिस्थळावर चढून घोषणाबाजी करणे योग्य नाही, असे मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले होते. तसेच सोशल मीडियावरूनही अनेकांनी भरत गोगावले यांचा समाचार घेतला होता.
टीकेचा हा वाढता ओघ पाहून बुधवारी संध्याकाळी भरत गोगावले यांनी जाहीर माफी मागितली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अथवा पदाधिकाऱ्यांचा हेतू नव्हता. शिवभक्त म्हणून नेहमी रायगडावर जाऊन नतमस्तक होत असतो. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांकडून अजाणतेपणाने राजकीय घोषणा दिल्या गेल्या. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे गोगावले यांनी सांगितले.
यापूर्वी २०१६ मध्ये भरत गोगावले महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाण्याचे कथित शुद्धीकरण केल्याच्या वादात सापडले होते. तेव्हाही विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र, आपण पाण्याचे शुद्धीकरण केलेले नसून, केवळ राज्य सरकारच्या कार्यक्रमानुसार तिथे जलपूजन केल्याचे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी सभागृहात दिले होते.