'आपण पंढरपूर-शिर्डीला जातो, तसे उद्धवजी अयोध्येला जातात, त्यामध्ये गैर काय?'

उद्धवजींच्या अयोध्या दौऱ्यामुळे महाविकासआघाडीला कोणताही धोका नाही

Updated: Mar 8, 2020, 08:14 AM IST
'आपण पंढरपूर-शिर्डीला जातो, तसे उद्धवजी अयोध्येला जातात, त्यामध्ये गैर काय?' title=

रोहा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनीही अयोध्येत जाण्यात गैर काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महामेळाव्यासाठी त्या शनिवारी रायगडमध्ये आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आपण सारेच पंढरपूर किंवा शिर्डीला जातो. मीदेखील दरवर्षी पंढरपूरला जाते, अजमेरला जाते, जेजुरीला जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे राज्यातील आघाडी सरकारवर काहाही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नाही', अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्र

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा होता. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जमीन द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. 

अयोध्येत जमीन द्या; रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारू- उद्धव ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे एक जुने व्यंगचित्र व्हायरल होत आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी हे व्यंगचित्र ट्विट केले आहे. अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नाही, अशी टिप्पणी या व्यंगचित्रात करण्यात आली आहे.