अत्याधुनिक मोबाइल आणि जबरदस्त नेटवर्क यामुळे प्रत्येकजण मोबाइलमध्ये अडकलं आहे. यामध्ये लहान मुलंही खेचली गेली आहेत. अभ्यासाच्या किंवा शांत बसण्याच्या कारणाने मुलांच्या हातात पालक सर्रास मोबाइल देतात. पण हाच मोबाइल मुलांना नकोत्या वयात पॉर्न बघण्याची सवय लावतो. लहान वयातच हार्मोन्सच्या बदलामुळे मुलांना अश्लील व्हिडीओ किंवा पॉर्न पाहण्याची उत्सुकता वाढते. काय खरं काय खोटं हे न समजण्याच्या वयात त्यांच्याकडे लैंगिक शिक्षणाची माहिती चुकीच्या पद्धतीने पोहोचते. अशावेळी पालकांनी मुलांशी कसा संवाद साधावा हे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी सांगतात.
5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हा आठवडा लैंगिक अत्याचार आणि लैंगिक हिंसा जागृती सप्ताह म्हणजे Sexual Abuse And Sexual Violance Awarness Week म्हणून साजरा करतो. या निमित्ताने डॉ. उर्वी महेश्वरी यांच्याशी साधलेला हा संवाद. अनेकदा पालकांच्या लक्षात येतं की, मुलाला पॉर्न पाहण्याची सवय लागली आहे किंवा तो पाहतो. पण यासंदर्भात त्याच्याशी कसा संवाद साधायचा? याबद्दल डॉ. उर्वी महेश्वरी यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.
झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी म्हणाल्या की, वयानुसार मुलांमध्ये काही शारीरिक बदल होत असतात. या काळात दोन्ही पालकांनी मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या वयानुसार मुले आजकाल खूप हुशार होत आहेत. टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना खूप काही समजायला लागलं आहे. काही वेळा या सर्व माध्यमांतून चुकीची माहितीही त्यांच्यापर्यंत पोहचते. त्यामुळे मुलांच्या लैंगिक हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांना योग्य माहिती देणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी सर्वात आधी मुलांशी मैत्री केली पाहिजे. तसेच लैंगिक विषयांवर मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे.
इंटरनेट, स्मार्ट फोन, सोशल मिडीया अशा इतर ठिकाणाहून मुलं चुकीची लैंगिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना पालकांनी स्वत: योग्य शब्दांत योग्य ते त्यांच्या वयानुसार योग्य ज्ञान पोहचवणं गरजेचं आहे. न लाजता किंवा अपराधीपणाची भावना न बाळगता पालकांनी आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगला आणि वाईट स्पर्श या गोष्टी मुलांना व मुलींना या वयातच शिकवल्या पाहिजेत. लैंगिक शिक्षण शाळेबरोबरच घरातूनही मिळायला हवे. किशोरवयीन मुलांना त्या वयात होणाऱ्या शारीरीक बदलांविषयी माहिती दिली पाहिजे. हे शारीरिक बदल सामान्य आहेत हे मुलांना समजावून सांगा. याशिवाय लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कोणते वय योग्य आहे हे मुलांना शिकवा. या संदर्भात केलेल्या पोक्सो कायद्याची माहिती देऊन चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखले पाहिजे. मुलांना लैंगिक संक्रमित रोग, एचआयव्ही, एटीडी याविषयी शिक्षण दिले पाहिजे.