मुंबई : रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यावरून शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आमचे 25 नव्हे तर तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा पलटवार केलाय.
रावसाहेब दानवे यांनी काल धुळवडीच्या दिवशी सत्ताधारी पक्षांचे 25 आमदार नाराज आहेत. ते विधीमंडळ अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. मात्र, पक्षनेत्यांनी त्यांची समजूत घातली त्यामुळे ते अधिवेशनात येत आहेत. मात्र, निवडणुका आल्या की हे आमदार भाजपमध्ये येतील, असे ते म्हणाले होते.
केन्द्रीय राज्यमंत्री दानवे याचा हा दावा खोटा ठरवितानाच संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. रावसाहेब दानवे यांना जितके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असे मला माहित आहे. किंवा दुसरी कोणती नशा ते करत नाहीत.
रावसाहेब दानवे यांना कदाचित 125 बोलायचं असेल पण त्यांचे स्लीप आँफ टंग झाली असेल. सगळेच आमदार घ्या, थांबलात कशाला. काल होळी संपली आणि आज त्यांची नशा उतरली असेल. त्यामुळे काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
तुम्ही म्हणताय की आमचे २५ आमदार तुमच्या संपर्कात आहेत. पण, आम्ही असं बोललो की तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत तर खरं वाटेल का? पण, तुमचे आमदार आमच्या संपर्कात आहेतच, असा दावा करत राऊत यांनी दानवे यांच्यावर पलटवार केलाय.