'त्या' उपवराला घातला १८.५० लाखांचा गंडा...

दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या एका ६५ वर्षीय उपवराला तब्बल १८.५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 7, 2017, 09:07 PM IST
 'त्या' उपवराला घातला १८.५० लाखांचा गंडा...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

पिंपरी : दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या एका ६५ वर्षीय उपवराला तब्बल १८.५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फ्रान्सिस मर्सी या इसमासह एका महिलेवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे लग्न त्याने जीवनसाथी डॉट कॉमद्वारे जुळवले होते. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खादी ग्राम उद्योगामधून निवृत्त झालेल्या एका वृद्धानं याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. हे गृहस्थ थेरगाव येथे राहतात. त्यांना दुसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा असल्याने त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रिमोनी साईटवर आपले प्रोफाईल अपलोड केले. हे प्रोफाईल पाहून फ्रान्सिस व त्याच्या साथीदार महिलेने मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला.

'तुमची प्रोफाईल मला आवडली आहे. माझ्या वडिलांमागे असलेली संपत्ती मी लवकरच भारतात पाठवणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे भरावे लागणार आहेत. तुम्ही तेवढे पैसे बँक खात्यात भरा,' असं आरोपी महिलेनं या वृद्धाला सांगितलं. तिच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार वृद्धानं २५ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबर या दरम्यान तब्बल १८ लाख ५० हजार रुपये भरले. परंतु, केवळ पैसे लाटण्याच्या हेतूने महिलेनं एनआरआय असल्याचा खोटा बनाव रचल्याचं लक्षात येताच वृद्धानं पोलिसांकडे धाव घेतली.  याप्रकरणी फौजदार संगीता गोडे अधिक तपास करत आहेत.