राज्यात कोरोनाचा चौथा बळी, ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

 नवी मुंबईतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना

Updated: Mar 26, 2020, 12:26 PM IST
राज्यात कोरोनाचा चौथा बळी, ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू title=

मुंबई : कोरोनाचा राज्यात चौथा बळी गेला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. देवनार भागातील एक महिला करोना सदृश्य आजारामुळे नवी मुंबईतील डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ३ दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाली होती. त्याठिकाणी ती महिला आणखी सिरीयस झाल्याने तिला नवी मुंबई महापालिकेच्या वाशीतील रुग्णालयात विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्डमध्ये ) दाखल करण्यात आले होते. 

तेव्हा तिचे तपासणीसाठी घेतलेले ब्लड सॅम्पल आणि स्वॅब मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पाठवले असता सदर महिला करोना बाधित (पॉझिटिव्ह) असल्याचे स्पष्ट झाले. परंतु कस्तुरबाचा रिपोर्ट येईपर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रात कोरोनाने एकूण चार जणांचे बळी घेतले आहेत. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ वरून १२८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

नवी मुंबई येथे मौलवीचा मुलगा आणि मोलकरीण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. वाशीतील मशिदीत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या वास्तव्यात आलेल्यांची चाचणी केली गेली.

त्यानंतर हे कोरोना पॉझीटीव्ह समोर आले आहेत. यातील काही जणांचे रक्ताचे नमुने यायचे आहेत. त्यामुळे या रुग्णांमध्ये किती रुग्ण पॉझिटीव्ह येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.