मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आल्याने राज्यात आजपासून अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये (lockdown) शिथिलता आणली गेली आहे. त्यामुळे सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहे. मात्र, काही रेड झोन जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. रेड झोनमधील रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 'ब्रेक द चेन अंतर्गत' रत्नागिरी जिल्ह्यात दोन ते आठ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्यास सह जिल्हा प्रवेश बंदी करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 2 जून 2021 पासून 8 दिवसाचे कडक लॉकडाऊन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दोन जून ते आठ जून 2021पासून कडक लॉकडाऊन असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. केवळ अंत्यसंस्कार वैद्यकीय आणीबाणी यासाठी जिल्ह्यात प्रवेश करता येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आली आहे.
निकडीची गरज असेल तर त्यासाठी 48 तासापूर्वीच कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच मेडिकल दुकाने आरोग्यविषयक सेवा आणि आरोग्यविषयक अस्थापना पूर्ण वेळेत सुरु राहतील. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची दुकान आणि आस्थापना पूर्ण बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दूध आणि किराणामालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा देण्याची सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली आहे. त्याचेळी रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.
शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषी विषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या काळात सुरु ठेवणेस मुभा राहील. याबाबतचा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील. आदेशाची अंमलबजावणी दिनांक 2 जून, 2021 रोजी सकाळी 07.00 वाजल्यापासून ते 8 जून, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेशात म्हटले आहे.