जालना : काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सत्तार-दानवेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली. त्यानंतर सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार आणि दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला होता.
लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला आव्हान देत औरंगाबादमधून बंडाचे निशाण फडकवले. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मात्र, त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला. जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. अलिकडेच सत्तार यानी दानवे यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला थोडा ब्रेक लागला. मात्र, रविवारी सत्तार यांनी दानवेंच्या भोकरदनमधील निवासस्थानी जावून भेट घेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. आता सत्तार भाजपमध्ये नेमका कधी प्रवेश करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.