Maharashtra Weather News : मागील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात लक्षणीय बदल झाले असून, उत्तर भारतात मात्र थंडीचा कडाका वाढण्याचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी रात्रीपासूनच काश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू झाल्यानं नजीकच्या भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. इथं महाराष्ट्रात उत्तरायणाच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानात सातत्यानं बदल होत असून, राज्यातील बहुतांश भागांवर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
हवामान विभागानं सदर परिस्थितीचं निरीक्षण करत वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासमवेत मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात सातत्यानं निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि सातत्यानं निर्माण होणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहता याच कारणास्तव तापमानात चढ- उतार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुंबईसह नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये धुकं आणि धुरक्याचं साम्राज्य असेल, तर राज्यातील विदर्भात मात्र थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये निच्चांकी तापमानात वाढ झाली असून, हा आकदा 13 अंशांच्या घरात आहे. तर, राज्यातील सर्वाधिक तापमान रत्नागिरी इथं नोंदवण्यात आलं जिथं हा आकडा 34 अंशांदरम्यान राहिला. पुढील 24 तासांमध्ये राज्यात ऊन, वारा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा मारा असं सतत बदलणारं हवामानाचं चक्र अडचणी वाढवताना दिसणार आहे.