PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत; शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, कुठे वाहन नेण्यास मनाई?

PM Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी आज मुंबईत येत आहेत. कसा असेल त्यांचा दौरा, पाहा...   

सायली पाटील | Updated: Jan 15, 2025, 07:20 AM IST
PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत; शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, कुठे वाहन नेण्यास मनाई?  title=
Mumbai news traffic advisory issued amid PM Modis maharashtra visit know the peurpose of meeting

PM Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईत येत असल्याच्या धर्तीवर शहरातील वाहतूक विभागाच्या वतीनं काही निर्देश जारी करत वाहतूक व्यवस्थेतील बदलांकडे नागरिकांचं लक्ष वेधलं आहे. भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत.

मुंबई दौऱ्यादरम्यान मोदी हे महायुतीच्या सर्व मंत्री आणि आमदारांची भेट घेतील. दोन तासांच्या या भेटीसाठी सर्व मंत्री, आमदारांना  उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. ५ डिसेंबरला महायुती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली होती. त्यानंतर ते आता दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत.

कसा आहे पंतप्रधानांचा दौरा?

मुंबईच्या नौदल गोदीत पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी 10.30 च्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रर्पण होईल. यानंतर महायुतीचे मंत्री आणि आमदारांना ते मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी मंत्र्यांसह आमदारांना काय कानमंत्र देतात याबाबत उत्सुकता आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

हेसुद्धा वाचा : शरद पवार अमित शहांबद्दल असं म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला

 

वाहतुकीतील बदल 

  • पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ओवे गाव पोलीस स्थानक ते जे कुमार सर्कल आणि ग्रीन हेरीटेज इथं दोन्ही मार्गांनी वाहनांच्या प्रवेशास मनाई असेल. दरम्यानच्या काळात व्हीआयपी वाहनं, पोलीस वाहनं आणि आपात्कालिन वाहनांचा प्रवेश मात्र या मार्गावर सुरूच राहील. 
  • प्रशांत कॉर्नरच्या दिशेनं ओवे गाव इथं जाणाऱ्या वाहनांनी जे कुमार सर्कलहून डावं वळण घ्यावं. 
  • ओवे गावहून जे कुमार सर्कलच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांनी प्रशांत कॉर्नर इथून उजवं वळण घ्यावं. 
  • शिल्प चौकातून जे कुमार सर्कलच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांनी ग्रीन हेरिटेज सर्कलपाशी पोहोचून त्यानंतरचं वळण घ्यावं. 
  • ग्राम विकास भवनहून येणाऱ्या वाहनांनी ग्रीन हेरिटेज चौक इथं डावं वळण घेत बीडी सोमाणी शाळेच्या इथून सरळ प्रवास करावा. 
  • सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकापासून ओवे गावच्या दिशेनं येणाऱ्या खासगी वाहनांनी ग्राम विकास चौकच्या दिशेनं सरळ जात डावं वळण घ्यावं. 
  • ग्राम विकास चौक ते गुरुद्वारादरम्यानच्या वाहनांनी ओवे गाव चौक इथं उजवं वळण घ्यावं. 
  • विनायक शेठ चौकातून बी डी सोमाणी शाळेच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांनी शाळेच्या चौकातून उजवं वळण घेत पुढील प्रवास करावा.