उद्धव ठाकरेंच्या खास माणसाविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई, म्हणाले- ‘मला हे माहितीच होतं!’

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई आली आहे. या धाडीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 18, 2024, 11:58 AM IST
उद्धव ठाकरेंच्या खास माणसाविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई, म्हणाले- ‘मला हे माहितीच होतं!’ title=

MLA Rajan Salvi : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार साजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे. आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी, राजापूरसह इतर ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग  येथील कार्यालयात हजर राहिले होते. या कारवाईनंतर राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. राजन साळवी यांच्या उत्पन्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर छापेमारी केली. एसीबीने तीन पथकांच्या माध्यमातून ही कारवाई केली. एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन साळवींकडे उत्पन्नापेक्षा जास्त 118 टक्के संपत्ती असल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तसेच तक्रारीमध्ये आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, पत्नी आणि मुलाचा उल्लेख करण्यात आला आहे. राजकीय सुडातून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. ठाकरेंची साथ सोडली नाही म्हणून मला त्रास दिला जात आहे, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांनी 3 कोटी 53 लाखची अपसंपदा जमा केल्याचा एसीबीचा आरोप आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती 2 कोटी 92 लाख अंदाजे इतकी होती. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा जमा केल्याचा आरोप रायगड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी दिली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

 जेल मला काही नवीन नाही - राजन साळवी

"मला अटक झाली तरी चालेल, अटक, जेल हे सर्व मला काही नवीन नाही आणि मी राजन साळवी काय आहे, हे मला स्वतःला माहिती आहे. माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे. मी सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केलं. कारण मला हे अपेक्षित होतं. ज्या दिवशी मला एसीबीकडून पहिली नोटीस मिळाली आणि मला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलं. त्याचदिवशी मला माहीत होतं, ही मंडळी माझ्या घरापर्यंत एक दिवस नक्की पोहोचणार, त्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं. तसेच, त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे," असे राजन साळवी यांनी म्हटलं आहे.