Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर आता करवाईचा बडगा उभारला जाणार आहे.उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील 468 धर्मादाय रूग्णालयांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी 10% खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी आणि 10% खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक असते. पण अनेकदा रुग्णालयांकडून उपचारासाठी चालढकल केली जाते. अनेकदा रुग्णांना याची माहिती नसते.
निर्धन, दुर्बल घटकांतील रूग्णांकरिता, उच्च न्यायालयाने तयार केलेल्या योजनेची प्रभावीपणे व पारदर्शी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी बैठकीत याबद्दल माहिती दिली. धर्मादाय रूग्णालयांतर्गत चांगले कार्य करणाऱ्या रूग्णालयांना उप मुख्यमंत्र्यांकडून गौरविण्यात येईल. तसेच रूग्णांना उपचार देण्यात टाळाटाळ करणाऱ्या रूग्णालयांवर नियमानुसार कारवाई देखील करण्यात येईल, असे डॉ.श्रीकर परदेशी यांनी बैठकीत नमूद केले.
निर्धन आणि दुर्बल लोकांना ताटकळत ठेवणे, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला अथवा शिधापत्रिका गृहित न धरणे, रूग्णालयांनी बाह्य यंत्रणेद्वारे रुग्णाच्या उत्पन्नाची स्वत: खात्री करण्याचा प्रयत्न करणे, जास्तीची कागदपत्रे मागवून अनामत रक्कम भरण्यास सांगणे, तसेच उपचाराचे पैसे भरण्यास सांगणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी वारंवार लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून शासनास प्राप्त होत असतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
काही रूग्णालये शासन निर्णयाचे तसेच कक्षामार्फत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करित नाही. मागील काळातील आकडेवारी पाहता धर्मादाय रूग्णालये या योजनेंतर्गत राखीव खाटा त्या घटकांतील रूग्णांना उपलब्ध करून देण्यात नसल्याचे दिसून आले आहे. धर्मादाय रूग्णालयामध्ये समाजसेवकांची बसण्याची व्यवस्था दर्शनी भागात नसणे तसेच त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला न जाणे, रूग्णालयात असलेल्या योजनेबाबतची माहिती देखील उपलब्ध करून दिली न जाणे, या बाबी वेळोवेळी निदर्शनास आल्या असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
वरील माहिती रुग्णालयाने तातडीने दर्शनी भागावर लावावी. निर्धन आणि दुर्बल घटकासंबंधी योजनेचा जास्तीत- जास्त रूग्णांना फायदा देण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि रेशनकार्ड तपासून योजनेचा फायदा देण्याचे तसेच, राज्यस्तरीय विशेष मदत कक्षामार्फत आलेल्या अर्जावर प्राथम्याने कार्यवाही करण्याबाबत आवाहन धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी यावेळी केले.