Laadki Bahin Installment: लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget) निर्णय घेतला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयांचा असणार आहे. दरम्यान येत्या आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. या महिन्याचा लाडक्या बहिणीचा हफ्ता 26 जानेवारीच्या आसपास दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
या महिन्याच्या हफ्त्यातही लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळात 2100 रूपये देण्याचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं आहे. विरोधकांनी यावर नेहमीच टीका केली आहे, जे वचन आम्ही दिलं आहे ते पूर्ण करू असं त्या म्हणाल्या आहेत. महिन्याला 3690 कोटींची तरतूद केली आहे. फेब्रुवारीची तरतूदही करतोय. खंड न पडता द्यायचा प्रयत्न करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.
"काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुबार योजनांचा लाभ घेतलेले यातून कमी होतील. तक्रारी, तपासणी यातून आकडा कमी होईल. मागील महिन्यांच्या तुलनेत एखादा टक्का कमी होईल. एक दोन लाख संख्या कमी होईल," असं त्या म्हणाल्या आहेत.
याआधी अदिती तटकरे यांनी कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करून छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र केले जातील असं सांगितलं होतं.
“तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत; चारचाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील; आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत; आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.