Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात 44 दिवसानंतर मोठा खुलासा झाला आहे. चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोषी कोण आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या अपघातात 9 जणाचां मृत्यू झाला होता. या अपघातमुळे मुंबईत खळबळ उडाली होती.
9 जानेवारी 2024 रोजी कुर्ला एलबीएस रोडवर हा अपघात झाला आहे. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला. बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली. या बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता तर, 41 जण जखमी झाले होते. घटनास्थळी मोठा गोंधळ झाला होता. या अपघात प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोषी ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे.
बेस्ट प्रशासनाने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या अपघाताचा चौकशी अहवाल सादर केला. कुर्ला बेस्ट बस अपघातास चालकच जबाबदार होता. अपघातावेळी बसमध्ये कोणताही दोष नव्हता, असा निष्कर्ष बेस्टच्या चौकशी अहवालात मांडला आहे.
या अपघाताची चौकशी बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आली. यात चालक मोरे याने निर्धारित 15 दिवसांऐवजी तीन दिवसांचेच प्रशिक्षण घेतल्याचे निदर्शनास आले. बेस्टनेही बस आणि चालकांचा पुरवठा करणाऱ्या मौर्या कंपनीसोबतच्या कराराची कागदपत्रे तयार केली नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अपघातानंतर चालक मोरे याने यांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा दावा केला होता. वैद्यकीय चाचणीतही चालक मद्यधुंद नसल्याचे तसेच मानसिक आजारी नसल्याचे निदान करण्यात आले होते. अपुऱ्या प्रशिक्षणावरही चौकशीत ठपका ठेवण्यात आला आहे. अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत बसमध्ये कोणताही दोष आढळला नाही.
बेस्टच्या अहवालानुसार मौर्या कंपनीने केवळ तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर 1 डिसेंबर रोजी मोरेला कामावर रुजू केले. त्याला मॅन्युअल गीयर आणि डिझेल प्रकारातील बस चालवण्याचा अनुभव असताना, त्याच्या हातात थेट स्वयंचलित इलेक्ट्रिक बस दिल्याने हा अपघात झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.