चेतन कोळस, येवला : अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर वर्ष अखेर शेतकऱ्यांवर दुसरं संकट आलं आहे. अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकालाही बसलाय. मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं आधीच कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळं कांदा उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंद महासागरामध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळाचा थेट परिणाम कांदा उत्पादनावर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा येवला तालुक्यात ४० हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड घटणार आहे. अवकाळी पावसामुळं अकराशे ते बाराशे कोटी रुपयांचा फटका कांदा उत्पादकांना बसणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसंच कांदा निर्यात खुली करावी, अशी मागणी केली जाते आहे.
रोजच्या वातावरण बदलामुळं रोपं खराब होतायत. मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची चिन्हं नाहीयत. परिणामी कांदा उत्पादक आणखीच मेटाकुटीला आले आहेत.
कधी गारपीट, कधी धुकं, कधी अवकाळी पाऊस... निसर्गाचा कोप काही केल्या थांबत नाहीये. अशा अस्मानी संकटाच्या काळात गरज आहे ती सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची.