पाथर्डी: कोव्हिड काळात सर्वात जास्त अहोरात्र मेहनत तर डॉक्टरंनी घेतली आहे. पण एका डॉक्टरांवर आयुष्य संपवण्याची वेळ आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गणेश शेळके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी इथे घडली आहे.
डॉ. गणेश शेळके हे आरोग्य अधिकारी म्हणून करंजी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत होते. डॉ शेळके हे गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना काळात करंजी आरोग्य केंद्रात कार्यरत होते. शेळके यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. त्यातच त्यांना पगार कपातीची धमकी देखील वरिष्ठांकडून मिळत होती.
आधीच अहोरात्र कोरोनासाठी घेतलेली मेहनत आणि त्यात होणारा हा सततचा छळ त्यामुळे कंटाळून डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं आहे. सुसाईड नोट लिहून त्यांनी आरोग्य केंद्रातच गळफास घेतला. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे म्हटलं आहे.
पगार वेळेवर मिळत नाही, अतिरिक्त भार आणि पगार कपात करण्याची धमकी देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे डॉ.शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. डॉ शेळके यांच्यावर अन्याय झाला असून त्यांना न्याय मिळावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी डॉ. गणेश शेळके यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी केली आहे.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. डॉक्टरांच्या आत्महत्येस तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलं आहे. त्यामुळे आता कारवाईची मागणी सहकाऱ्यांकडून होत आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली.