अहमदनगर : अहमदनगरमध्ये महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेस तसंच बहुजन समाज पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधित नगरसेवकांवर कारवाईचे संकेत दिलेत.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांनी पक्ष भूमिका झुगारून भाजपला मतदान केले. यामुळे, नगरला अल्पमतात असलेल्या भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून आला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची ही बंडखोरी पक्षाच्या भाजपाविरोधी लढ्याला सुरुंग लावणारी ठरलीय. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरसेवकांकडून खुलासा मागवलाय. पाच जानेवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत या नगरसेवकांना देण्यात आलीय. ४८ तासांत या नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. नगरमध्ये रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते.
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबित केल जाणार आहे. बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी हा निर्णय जाहीर केलाय. महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बसपानं उमेदवार उभे केले आणि ते निवडूनही आले. मात्र आता या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. मतदान करताना या सर्व नगरसेवकांनी हात उंचावून भाजपला मत असल्याचे जाहीर केलं आणि भाजपाचा महापौर निवडून दिला. बहुजन समाज पार्टीने याची गांभीर्याने दखल घेतली असून निवडून आलेल्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं साखरे यांनी सांगितलं.