चौकशी करा किंवा काही करा, मला फरक पडत नाही; बोरवणकर यांच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर

मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. येरवड्यातल्या पोलिसांच्या जागेशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  

वनिता कांबळे | Updated: Oct 17, 2023, 06:03 PM IST
चौकशी करा किंवा काही करा, मला फरक पडत नाही; बोरवणकर यांच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर title=

Ajit Pawar On Meera Borwankar : आर आर पाटलांचा विरोध असतानाही अजित पवारांनी पोलिसांची जमीन बिल्डरांना द्यायला सांगितली अस गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. आर आर पाटलांविषयी दादांनी वाईट शब्द वापरल्याचा दावा देखील मीरा बोरवणकर यांनी केला आहे. चौकशी करा किंवा काही करा, मला काही फरक पडत नाही असं म्हणत अजित पवार यांनी मीरा बोरवणकर यांच्या गंभीर आरोपांवर पलटवार केला आहे. 

अजित पवार यांचे मीरा बोरवणकर यांच्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर

गृह खात्याचे काम होऊ दिले जात नव्हते. सरकारचे नुकसान होईल असे काम मी करत नाही. चौकशी करा किंवा अन्य काही करा मला काही फरक पडत नाही. पालकमंत्री आपापल्या परीने काम करत असतात, असे अजित पवार म्हणाले. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबध नाही. त्या आरोपांना मी काही फारसं मनावर घेतलं नाही, मी भलं माझं काम भलं, असेही ते म्हणाले.

येरवड्यातल्या पोलिसांच्या जागेशी आपला काहीही संबंध नाही

मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. येरवड्यातल्या पोलिसांच्या जागेशी आपला काहीही संबंध नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आढावा घेणं याचा अर्थ हस्तक्षेप करणं असा होत नाही. अजूनही तो भूखंड सरकारच्याच ताब्यात आहे असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. 

मीरा बोरवणकरांनी काय आरोप केले

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी अजित पवारांवर थेट आरोप केले..येरवडा इथली पोलिसांची जागा शाहिद बलवा बिल्डरला द्यायला अजित पवारांनी सांगितलं..मात्र आपण त्यास विरोध केला. तर तुम्ही यात पडू नका, असा सल्ला तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनी दिला. बिल्डरला जागा देण्याचा निर्णय त्यांनी बदलल्याचंही त्या म्हणाल्या. 

रोहित पवार यांनी केली चौकशीची मागणी

मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात दंड थोपटलेयत. जमीन कुणी कुणाला दिली याची चौकशी झाली पाहिजे...सरकारने याची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केलीय. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दादांनी पोलिसांची जमीन बिल्डरला देण्यास सांगितले होते मात्र आपण नकार दिल्याचा दावा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकात केलाय. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय...

मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर केलेल्या टीकेवरून शिंदे गटात मतभेद

मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर केलेल्या टीकेवरून शिंदे गटात मतभेद असल्याचं दिसून येतंय. निवृत्त झाल्यानंतर पुस्तक संस्कृतीच्या माध्यमातून विशिष्ठ लोकांना टार्गेट केलं जातंय असं सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजितदादांची पाठराखण केलीय. दुसरीकडे मीरा बोरवणकर या चांगल्या अधिकारी आहेत. दादाच त्यांच्या आरोपांना उत्तर देतील असं सांगत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय. 

बोरवणकरांचे आरोप म्हणजे अजितदादांविरोधात षडयंत्र असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप

येरवडा जेलच्या जागेवरून माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर राजकारण तापलंय. बोरवणकरांचे आरोप म्हणजे अजितदादांविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलाय. श्रेयवादाच्या लढाईतून दादांना बदनाम केलं जातंय असंही धनंजय मुंडेंनी म्हंटलंय.