Ajit Pawar Satara Press Conference: विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी 'सामना'मधील अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली. तसेच कर्नाटकमधील निपाणी येथील जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांमधील पक्ष असा करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अजित पवारांनी पत्रकार परिषदेमधील एका प्रश्नाला उत्तर देताना टोला लगावला.
संजय राऊत यांनी 'सामना'मधील अग्रलेखाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी अशा विधानांना फार महत्त्व देऊ नये असं मत व्यक्त केलं. "कुणी मनात येईल ते बोलत असेल तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार नाही," असं अजित पवार म्हणाले.
सुप्रीम कोर्टामधील निकालाच्या पार्श्वभूमीवर सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, "आमच्या सरकारला धोका नाही असं प्रत्येक सरकार म्हणतं. प्रत्येकाला आपल्या सरकारला धोका नाही असं वाटतं. मात्र शिंदे-भाजपा सरकारमध्ये अधिकारी दबावाखाली आहेत. सरकारमध्ये आर्थिक ओढाताण असल्याची शक्यता. दर्जेदार कामाची बिलं सरकारने द्यायला हवीत," असं अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरुनही अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीमध्ये रविवारी भाजपाच्या महिला उमेदवार शशीकला जोले यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीने केवळ निपाणीमध्ये उमेदवार दिला असल्याचा संदर्भ देत फडणवीसांनी राष्ट्रवादीचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांमधील पक्ष असा केला. "राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. त्यांना (राष्ट्रवादीला) पॅकबंद करून महाराष्ट्रात पाठवा, आम्ही (त्यांना) पाहून घेऊ," असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकच्या नागरिकांना भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. याच टिकेवरुन अजित पवार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी, "फडणवीसांनी आमची काळजी करु नये. त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते असू तर विरोधकच उरत नाहीत," असंही म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवरही अजित पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली. राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही, असं अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. कुठल्याही पक्षाचा असला तरी मराठी उमेदवारांना निवडून आणा असं ट्वीट राज यांनी केलं होतं. मात्र महाराष्ट्र एकिकरण समितीने टीका केल्याने त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.