अकोला : राज्यात एकीकडे पावसाचा तडाखा बसला आहे तर दुसरीकडे वावटळीचं मोठं संकट ओढवलं आहे. अकोल्यात अचानक वावटळ आली आणि रस्त्यात दिसेल त्याला आपल्यासोबत घेऊन गेली.
अकोल्यातील देवरी फाट्यावरील वावटळीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या देवरी फाटा येथे काल आलेल्या वादळामुळे मोठं नुकसान झालं. या वादळाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अकोला वातावरणात अचानक बदल झाला. 45 अंश सेल्सिअस पारा ओलांडलेल्या अकोल्यात काल थोडा दिलासा मिळाला. पण काही ठिकाणी निसर्गाचा प्रकोप ही पाहायला मिळाला.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा
यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच पण त्याआधीच मान्सूनपूर्व पावसानं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला. मान्सूनची घोडदौड वेगाने सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी शुक्रवारी वादळी पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत फळबागांचं नुकसान झालं. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो आहे. महाराष्ट्रातही या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो आहे.