पुणे : महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रविंद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर.के. गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिकार काढल्याने मराठे आणि गुप्ता यांना बँकेसंर्दभातील कोणतेही निर्णय घेता येणार नाही. बँकेचे कार्यकारी संचालक आर.एन. राऊत यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे. मराठे आणि गुप्ता यांचे निलंबन करण्याचा अधिकार संचालक मंडळाला नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे त्याबाबत सरकार निर्णय घेईल. तत्पूर्वी महाराष्ट्र बँकेच्या इतर तीन अधिकाऱ्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर माजी अध्यक्ष सुशील मुहनोत, कार्यकारी संचालक आर.के गुप्ता आणि झोनल मॅनेजर नित्यानंद देशपांडे यांना पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान मराठेंना पुण्यातील कोर्टाने दिलेल्या जामिनाविरोधात ठेवीदारांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे.