अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वडाळी परिसर व ए आर पी कॅम्प परिसरात स्वच्छता व कचरा उचलून नेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपच्या महिला नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी त्यांच्या प्रभागातील लोकांच्या घरातून कचरा गोळा केला आणि स्वतः सायकल रिक्षा चालवत तो कचरा अमरावती महानगरपालिकेच्या आवारात फेकून देत प्रशासनचा निषेध केला.
एकीकडे अमरावती महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता असतानाच भाजपच्या नगरसेविकेने केलेल्या या आंदोलनामुळे भाजप तोंडावर पडली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने अमरावती शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशातच शहरातील वडाळी व एसआ पी कॅम्प परिसराच्या भाजपच्या नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या या प्रभागात मोठया प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
कोरोनाची साथ असताना धुवारणी, फवारणी होत नाही. शौचालय भरले असताना सुद्धा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांन कडून साफसफाई व कचरा उचलून नेत नसल्याचा आरोप या नगरसेविकेने केला आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त यांच्या कडे तक्रार देऊनही कुठलीही दखल न घेतल्याने आज अखेर एका तीन चाकी सायकलरिक्षात परिसरातील कचरा टाकून या नगरसेविकेने स्वतःहा तो कचरा घेऊन महानगरपालिकेत धडक देत आंदोलन केले.
माझ्या प्रभागातील नागरिकांना खूप त्रास होतोय. चार-पाच दिवस कचऱ्याच्या गाड्या जात नाहीत. आयुक्तांना स्वच्छतेविषयी निवेदन दिले होतो. वृत्तपत्राच्या माध्यमातून देखील मी सूचना दिल्या होता. कारवाई न झाल्यास मी पालिेकेच्या दालनात कचरा टाकेन असे मी आधी सूचित केले होते. यातूनही मार्ग सापडला नाही तर आंदोलन करु असे नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी सांगितले.