Amit Thackeray On Toll Naka Vandalization By MNS Workers: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा तसेच अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरेंची गाडी अडवल्याच्या मुद्द्यावरुन रविवारी मध्यरात्रीनंतर सिन्नरमध्ये तुफान राडा झाला झाला. अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी अहमदनगरमधील कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमित ठाकरे समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Highway) मुंबईला येताना सिन्नरमधील गोंदे फाटा टोलनाक्यावर अमित ठाकरेंची गाडी अडवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित ठाकरेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील गोंदे फाटा टोल नाक्यावर काही तरुणांनी तोडफोड केली. मनसे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी हा टोल नाका फोडल्याचं नंतर स्पष्ट झालं. उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जात असताना गोंदे टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली होती. याच गोष्टीचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी हा टोल नाका फोडला.
#samruddhiexpressway #TollPlaza | अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी फोडला समृद्धी महामार्गाचा टोलनाका#amitthackeray #MNS pic.twitter.com/FcufHLF9AC
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 23, 2023
मनसे कार्यकर्त्यांनी रात्री टोलनाका फोडल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अमित ठाकरेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. "फास्ट टॅग होता. पण तो रॉड खाली आला. त्यांचा काहीतरी तांत्रिक इश्यू होता. माझे सहकारी त्यांना बोलले की फास्ट टॅग आहे तुमची यंत्रणा काम करत नाहीय वगैरे. तर ते बोलले आमचे काहीतरी इश्यू आहेत. ते जरा उद्धटपणे बोलत होते. मग त्यांना सांगितलं की गाडी अशी अशी (कोणाची आहे) आहे. मग त्यांनी मॅनेजरला फोन लावला," असं अमित ठाकरे म्हणाले.
पुढे घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना अमित ठाकरेंनी, "मॅनेजर पण उद्धटपणे बोलत होता. वॉकी-टॉकीवरुन आवाज बाहेर येत होता. 10-15 मिनिटं गाडी थांबवून ठेवली आणि मग सोडली. मला वाटतं कोणाला तरी कळलं असेल कोणाची गाडी आहे. मला वाटतं टोल नाक्यावरुन सिन्नर किंवा नाशिकला कळवलं (गाडीबद्दल)," असंही सांगितलं.
यानंतर अमित ठाकरेंनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना हसतच, "मी हॉटेलला पोहोचल्यावर मला कळलं की टोलनाका फुटला," असं विधान केलं.