रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्याकडून अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांच्याबाबत जोरदार राजकीय चर्चा रंगत होती. ते शिवसेनेत पुन्हा जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर भाष्य केले. होय, मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. मनमोकळी चर्चा झाली आणि मागिल गैरसमज दूर झाल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मागितल्याचे म्हटले. त्यामुळे त्यांनी मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, येणारी कोणतीही निवडणूक मी लढवणार नाही, असेही गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे. मुलगा विक्रांत जाधव याच्यासाठी गुहागरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मी मागितले आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी भेट मुंबईत झाली. याभेटीत मनमोकळ्या गप्पा झाल्या, सगळ्याच विषयांवर झाली चर्चा, असा भास्कर जाधव यांनी खुलासा केला आहे.
२००४ साली शिवसेना का सोडली याबाबत देखील उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. आमच्या भेटीत मनमोकळ्या गप्पा झाल्या एकमेकांबाबत असलेला समज गैरसमज या भेटीतून दूर झाल्याचा दावा जाधव यांनी यावेळी केला.