रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : भाजपाच्या त्सुनामी पुढे सांगलीतील काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट झालाय. मात्र आता जिल्ह्यात बलाढ्य असणाऱ्या भाजपा समोरच इच्छुक उमेदवार जास्त असल्याने, विधानसभेचे उमेदवार निश्चित करताना डोकेदुखी वाढली आहे. तर शिवसेनेच्या तीन मतदारसंघावर भाजपाने दावा केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. दुसरीकडे आपल्या विधानसभेच्या दोनही जागा कायम ठेवण्याचे राष्ट्रवादी समोर आव्हान असणार आहे. आणि एकमेव आमदार असणारा काँग्रेस पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहे.
सांगली जिल्ह्यात अकरा तालुके असले तरी आठ विधानसभा मतदार संघ आहेत. यात सांगली, मिरज, पलूस, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, विटा, इस्लामपूर आणि शिराळा या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. मात्र लोकसभा निवडणुकी सांगली, मिरज, पलूस, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, विटा हे सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत तर इस्लामपूर आणि शिराळा हे दोन मतदारसंघ हातकणंगले मतदारसंघात सामाविष्ठ आहेत.
सांगली जिल्ह्यात मागील विधानसभेवेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपात गेले. २०१४ च्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात भाजपाचे एक खासदार आणि चार आमदार निवडून आले होते. या शिवाय राष्ट्रवादीचे दोन आमदार तर कॉंग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक एक आमदार झाले होते.
सांगली जिल्हा परिषदेत सध्या भाजपाची सत्ता आहे, तर भाजपाकडे पाच पंचायत समिती, राष्ट्रवादीकडे चार, कॉंग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक-एक पंचायत समिती आहे. तर सांगली महापालिकेत ही भाजपाची सत्ता आहे. तर कॉंग्रेस कडे तीन नगरपरिषदा, राष्ट्रवादी कडे दोन, भाजपाकडे एक नगरपरिषद आहे. तर भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक नगरपंचायत आहे. २०१९ च्या निवडणुकीत ही या ठिकाणी भाजपाचे खासदार संजय काका पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
सांगली हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एक खासदार आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाचे चार आमदार निवडून आले. तिथून भाजपा सांगली जिल्ह्यात ताकदवान पक्ष बनला. सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ, मिरजेचे आमदार-मंत्री सुरेश खाडे, शिराळा आमदार शिवाजीराव नाईक आणि जतचे आमदार विलासराव जगताप हे चार भाजापाचे आमदार आहेत. तर इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील आणि तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील हे दोन राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर विटा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आहेत. तर पलूस-कडेगाव मध्ये कॉंग्रेसचे विश्वजित कदम हे आमदार आहेत.
सांगली जिल्ह्यात पूर्वीच्या जागा वाटपानुसार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत मिरज, सांगली, पलूस कडेगाव, शिराळा हे मतदारसंघ कॉंग्रेसकडे होते. इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, विटा आणि जत हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते. आता मात्र सांगली, मिरज, जत, शिराळा या मतदारसंघावर दोन्ही कॉंग्रेसनी दावा केला आहे.
सांगली जिल्ह्यात पूर्वीच्या जागा वाटपानुसार भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये आघाडीत मिरज, सांगली, शिराळा, जत हे मतदारसंघ भाजपा कडे होते. तर पलूस कडेगाव, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, विटा हे मतदारसंघ शिवसेनेकडे होते. आता मात्र भाजपाने आपल्या चार मतदारसंघा सहित पलूस कडेगाव, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ या तीन मतदारसंघावर दावा केला आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्वच सताकेंद्रात भाजपाची ताकद असल्याने भाजपाला आमदार संख्या वाढण्याची खात्री वाटत आहे. तर आक्रमक झालेले शिवसेना नेते इस्लामपूर, तासगाव कवठेमहांकाळ, पलूस कडेगाव आणि सांगली या मतदारसंघावर आग्रही आहे.
1) मिरज : सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे मिरज विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आले आहेत. त्यापूर्वी ते जतमधून निवडून आले होते. जिल्ह्यात सलग तीन वेळा भाजपाचा आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्याचे फळ त्यांना या वेळी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळाली. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाकडे राहणार आहे. तरी आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडून सहा ते सात जण इच्छुक आहेत. मात्र खैरेंच्या विरोधात तगडा उमेदवार काँग्रेसकडे याठिकाणी नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सुद्धा हा मतदारसंघ मिळवण्यासाठी ताकत लावली आहे. पण भाजपाचा हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्यामुळे खाडे यांच्या विरोधात कोण हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
2) सांगली : आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दोन जण इच्छुक आहेत. मात्र यापैकी उमेदवार कोण असणार हे अजून निश्चित नाही. फार पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र जनता दलाचे तत्कालीन आमदार संभाजी पवार हे या ठिकाणाहून तीन वेळा जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. तर 2004 ला तत्कालिन अपक्ष उमेदवार मदन पाटील हे सुद्धा या मतदारसंघातून निवडून आले होते. 2014 ला भाजपाचे सुधीर दादा गाडगीळ हे निवडून आले. त्यामुळे अनेक वेळा काँग्रेसचा या मतदारसंघात पराभव झालेला आहे. सर्वात निधी आणणारा आमदार अशी सुधीर दादा गाडगीळ यांची ओळख आहे. भाजपचे निष्ठावान आणि शांत संयमी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आहे.
मात्र याठिकाणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर आणि माजी आमदार दिनकर तात्या पाटील हे दोघेही सांगली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक वर्ष भाजपात निष्ठावान अशी प्रतिमा असलेल्या नीता केळकर यांची उमेदवारी साठीची दावेदारी मोठ्याप्रमाणात मानली जात आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारच अशा आक्रमक पवित्र्यात केळकर आहेत. त्यामुळे आमदार सुधीर दादा गाडगीळ की नवा चेहरा याबाबत चाचपणी सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने सुद्धा या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसमधल्या मोठ्या नेत्याला आयात करून सांगली विधानसभेची उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे.
3) जत : जत विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र सलग तीन वेळा या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे यंदासुद्धा जत मतदार संघात भाजपचे पारडे जड असणार आहे. मात्र विद्यमान भाजपाचे आमदार विलासराव जगताप यांना स्थानिक नेत्यांचा विरोध आहे त्यामुळे इथे भाजपात इच्छुकांची संख्या वाढले आहे. जिल्हा परिषदेचे सभापती तमन्ना गोंडा रवी, डॉ. रवींद्र आरळी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना भाजपसमोर डोकेदुखी असणार आहे.
तर आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे असलेला जत मतदारसंघ या वेळी काँग्रेसने मागितला आहे काँग्रेसकडून विक्रम सिंह सावंत हे निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र हा मतदारसंघ आपल्याकडे रहावा यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित आघाडी ला या ठिकाणी मोठे मतदान झालं होतं त्याच पद्धतीने धनगर समाजाचे मतदान या मतदारसंघात जास्त आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडी कडून जत मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, तर दुसरी कडे गोपीचंद पडळकर यांच्या सारखा नवा चेहरा आयात करून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहे.
4) शिराळा : शिराळा मतदार संघात भाजपला 2014 मध्ये शिवाजीराव नाईक यांच्या रूपाने पहिल्यांदा यश मिळाले. यावेळी पुन्हा शिवाजीराव नाईक येथून इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघातील तरुण चेहरा आणि काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात देशमुख हे जाहीरपणे टीका करत आहेत. सत्यजित देशमुख यांना भाजपात घेतल्याने, विधानसभेची उमेदवारी देण्या बाबत चाचपणी सुरू आहे. सत्यजित देशमुख आणि आमदार शिवाजीराव नाईक हे दोन गट 25 वर्षां नंतर एकत्र आले आहे. त्यामुळे भाजपच पारडं जड झालं आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरोधात राष्ट्रवादी अशी लक्षवेधी लढत बघायला मिळणार आहे.
सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या मतदारसंघात भाजपा मध्ये अनेक जन इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवारी आणि मतदारसंघ निश्चित करताना भाजपा समोर मोठी डोकेदुखी आहे. सांगलीत भाजपाचे सुधीर दादा गाडगीळ हे आमदार आहेत, मात्र भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर बंडाच्या तयारीत आहेत.
तर इच्छुक अनेक असले तरी पक्ष जो निर्णय घेतो त्याच्या मागे सर्व भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते राहतात असा प्रति दावा आमदार सुधीर दादा गाडगीळ हे करत आहेत.
5) इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या मतदारसंघातून सलग सात वेळा विजयी झाले आहेत. सलग 29 वर्ष ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सहकारी संस्थांचे जाळे आणि विकास आणि प्रगती शेती यामुळे हा मतदारसंघ तसा सदर म्हणून ओळखला जातो. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेपर्यंत जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण असा असा प्रश्न निर्माण होतो. जयंत पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याचे शिवसेना आणि भाजपा यांचा प्रयत्न सुरू आहे.
युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र भाजपाने या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपाकडून इस्लामपूर की नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात कोण हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही.
6) तासगाव कवठेमंकाळ : तासगाव कवठेमंकाळ हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी या मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवला आहे. सुरुवातीला दोन वेळा काँग्रेस कडून आणि 1999 नंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर चार वेळा असे एकूण सहा वेळा आर आर पाटील या ठिकाणाहून आमदार झाले आहेत.
आर आर पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासगाव कवठेमंकाळ च्या जागेवर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील निवडून आल्या. त्यांची राष्ट्रवादीची उमेदवारी कायम असणार आहे.
तर त्यांच्या विरोधात भाजपाचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना भाजपा मधूनच खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांनी भाजपा उमेदवारीचा दावा करून आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यादेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मुळात हा मतदारसंघ शिवसेनेच्या कडे आहे. त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ सोडणार की नाही हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या मतदार संघात या मागणीवरून शिवसेना आणि भाजप दोन्ही आक्रमक झाले आहेत. इस्लामुपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ बरोबर जत, शिराळा या ही मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी होईल असा दावा राष्ट्रवादीचे नेते करत आहेत.
7) पलूस कडेगाव : पलूस-कडेगाव हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे. मात्र याठिकाणी दोन वेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव देखील झाला आहे. माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांनी सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. पतंगराव कदमांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे पुत्र विश्वजीत कदम हे बिनविरोध निवडून आले. यावेळी देखील काँग्रेसकडून आमदार विश्वजीत कदम हे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजप कडून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येथे कदम विरुद्ध देशमुख ही परंपरागत विरोधकांची अडीतटीची लढत बघायला मिळणार आहे. पण युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते येथून लढण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड यांनीदेखील निवडणूक लढण्याची ची तयारी केली आहे. या ठिकाणची निवडणूक रंगतदार असणार हे मात्र नक्की.
8) विटा : विटा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे पुन्हा निवडणूक रिंगणात असणार आहेत. या मतदारसंघ आघाडी मध्ये काँग्रेस की राष्ट्रवादी यापैकी कोणाच्या वाटेला मतदारसंघ येणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र इथली निवडणूक विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यातच होणार आहे. या मतदारसंघात लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मते या मतदारसंघात निर्णय ठरणार आहेत.
एकीकडे राजकीय मुद्दे गाजत असले तरी जिल्ह्यातील अनेक विकासाचे प्रश्न आणि समस्या आहेत. महापुरामुळे लोकांना मोठा फटका बसला, बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले, हजारो एकर शेती उध्वस्थ झाली आहे. तर दुसरी कडे पूर्व भागातील चार तालुके दुष्काळाचा सामना करत आहेत. जिल्ह्यातील सिंचन योजना अपूर्ण आहेत. रस्ते, आरोग्य या सारख्या सुविधांचाची सोय होणे गरजेचे आहे. मोठे उद्योग सांगली जिल्ह्यात नाहीत, शिवाय कारखानदारी अडचणीत आल्याने रोजगाराचा प्रश्न मोठा आहे.
सांगली जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जाणारा आहे. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगतात की विकासाची चर्चा होते ? यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.