पैसे, मोबाईलसारख्या वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी नवा फंडा

औरंगाबादच्या अभियंत्याची आयडियाची कल्पना

Updated: Apr 23, 2020, 05:43 PM IST
पैसे, मोबाईलसारख्या वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी नवा फंडा title=

विशाल करोळे, औरंगाबाद : कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून हात स्वच्छ धुण्यापासून भाजीपाला, फळे धुवून घेण्यापर्यंत खबरदारी सगळेजणच घेत आहेत. पण आपल्याकडील मोबाईल, पैसे, गाड्यांच्या चाव्या अशा वस्तुंचं काय? या वस्तू सॅनिटाईझ कशा कराव्यात? असा प्रश्न अनेकांना पडतो. औरंगाबादमधील एका अभियंत्यानं त्यावर एक तोडगा काढला आहे. विलास व्यवहारे या तरुण अभियंत्याने आयडियाची कल्पना लढवून घरी एक सॅनिटाईझ चेंबर बनवले आहे. त्यामुळे पैसे, चाव्या, मोबाईल यासारख्या वस्तू सॅनिटाईझ करता येणार आहेत.

काय आहे तंत्रज्ञान?

युव्ही म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट टेक्नॉलॉजी वापरून हे सॅनिटाईझ चेंबर बनवल्याचा व्यवहारे यांचा दावा आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अतिनील किरणांमुळे कोरोनाप्रमाणेच मानवी आरोग्याला धोकादायक असलेले असंख्य विषाणू नष्ट होतात, हे वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झाले आहे. या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे न्युक्लिएक एसिड नष्ट होऊन आणि त्यांच्या डीएनएमध्ये अडथळा आणून सुक्ष्मजीवांना निष्क्रिय करतात. रुग्णालये, प्रयोगशाळांमध्ये हे तंत्रज्ञान अनेक वर्षांपासून वापरले जाते. हेच तंत्रज्ञान वापरून युव्ही लाईट वापरून हे सॅनिटायझेशन चेंबर व्यवहारे यांनी घरीच तयार केले आहे.

सॅनिटायझेशन चेंबरचा उपयोग कसा करणार?

सॅनेटाझेशन चेंबर म्हणजे सॅनेटायझेशनचा बॉक्स वापरताना काही काळजी घ्यावी लागते. या बॉक्समध्ये वस्तू २० मिनिटे ठेवाव्यात. त्यानंतर १० मिनिटांनी थंड झाल्यावर त्या बाहेर काढाव्या लागतात. विशेष म्हणजे एकदा बॉक्समधील ट्युब सुरू झाल्यावर त्या बॉक्सकडे पाहायचं सुद्धा नाही, असं व्यवहारे यांनी सांगितलं.

 

कोरोना विरोधातील युद्धात काळजी घेणे आणि सावधानता बाळगणे इतकंच आपल्या हातात आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नवनवीन गरजा कशा भागवाव्यात याचा विचार करताना नवनव्या कल्पना लढवल्या जात आहेत. त्यातून असे छोटे-छोटे अविष्कार कोरोना विरुद्धचं युद्ध लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील.