विष्णु बुरगे, झी २४ तास, बीड : बीडमधील वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची ( beed waqf board land scam) व्याप्ती वाढत चाललीय. एका मशिदीची तब्बल 25 एकर जमीन हडपल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. झी 24 तासनं हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता पोलिसांनीही कारवाईसाठी कंबर कसली आहे. (beed waqf board land scam cases filed against 8 persons for grabbing 25 acres of land of a mosque)
माणूस माणसाला गंडा घालतो. पण बीडमधल्या भूमाफियांनी चक्क देवालाच गंडा घातलाय. झी २४ तासनं देवस्थान जमीन घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सहा गुन्हे दाखल करण्यात आले. आता या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढलीय.
भूमाफियांचा देवाला गंडा
बीड शहरातील सारंगपुरा मशिदीची २५ एकर ३८ गुंठे जमीन हडप करण्यात आली आहे. सर्व्हे नंबर 188 वरची ही इना म जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. ही जमीन बेकायदा खालसा करण्यात आली.
याप्रकरणी उप जिल्हाधिकारी नरहरी शेळकेसह तत्कालिन मंडळ अधिकारी, तलाठी आणि भूमाफिया अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झालेत.
देवस्थानची जमीन हडप करणाऱ्या पांढरपेशी टोळीचा म्होरक्या कोण, याची चर्चा आता रंगलीय. मशिदीची लाटलेली जमीन पुन्हा आमच्या ताब्यात द्या आणि देवाच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मशिदीच्या देखरेख करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी केली आहे.
देवस्थानाची जमीन हडप करण्याचा हा प्रकार धक्कादायकच म्हणायला हवा. भूमाफियांना आता देवाचीही भीती उरलेली नाही.अशा लोकांना जरब बसेल, अशी कठोर कारवाई व्हायला हवी.